राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ३ मार्चपर्यंत त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.
नवाब मलिक यांची बुधवारी सकाळपासून ईडीकडून चौकशी सुरू होती. जवळपास ८ तास ही चौकशी चालली. चौकशी केल्यानंतर त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली.
अटक केल्यानंतर त्यांची जे. जे. रुग्णालयात तपासणी केली गेली आणि मग कोर्टात हजर केलं गेलं.
हे प्रकरण अंडरवर्ल्डशी संबंधित आहे, मनी लॉंड्रिंगशी संबंधित आहे. त्यामुळे याप्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी ईडीची कस्टडी मिळावी, अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती.
ईडीच्या कस्टडीच्या काळात नवाब मलिक यांना औषधे आणि त्यांच्या घरातून जेवण मिळावे अशी मागणी नवाब मलिकांच्या वकिलांनी केली होती. न्यायालयानं ही मागणी मान्य केली आहे.
आपल्याला जबरदस्तीनं अटक करण्यात आली आहे, या प्रकरणी कोणताही समन्स न देता आपल्याला या ठिकाणी आणण्यात आलं आणि सही घेण्यात आली असा आरोप नवाब मलिकांच्या वतीने सत्र न्यायालयात करण्यात आला आहे.
आपल्यावर कोणत्या अधिकारांखाली कारवाई करण्यात आली आहे याचीही माहिती देण्यात आली नसल्याचं त्यांच्यावतीनं कोर्टाला सांगण्यात आलं आहे.
दाऊदची अनेक ठिकाणी बेनामी संपत्ती आहे. दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. हसिना पारकर आणि नवाब मलिक याचां संबंध आहे. नवाब मलिकांचा संबंध थेट अंडरवर्ल्डशी आहे, असाही आरोप आहे.
दाऊदशी संबंधित सात ठिकाणच्या संपत्तीचे मालक हे नवाब मलिक आहेत. डी गँगशी संबंधित संपत्ती मलिकांच्या कुटुंबियांनी खरेदी केली आहे, असे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहेत.
नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. आता नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचं मानण्यात येतंय.