Advertisement

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नमाजावरून वाद


मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नमाजावरून वाद
SHARES

मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी रात्री विनीत गोयंका या प्रवाश्यानं 'धरणे आंदोलन' केले.  काही प्रवासी एअरपोर्टवर प्रार्थनेसाठी नेमून दिलेल्या जागेऐवजी गँगवेमध्येच नमाज पढत बसल्यामुळे इतर प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागल्याचा आरोप विनीत गोयंका यांनी केला आहे. 


काय आहे नेमके प्रकरण? 

विनीत गोयंका आणि त्यांच्या पत्नी AI 101 या विमानाने मुंबईहून दिल्लीला निघाले होते. याच दरम्यान, विमानतळावर काही प्रवासी नमाज पढण्यासाठी गँगवेमध्ये बसले होते. विशेष म्हणजे, या प्रवाशांच्या बाजूला सीआयएसएफचे जवान देखील उभे होते. हे जवान येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना बाजूने जायला सांगत होते. यावर प्रवासी विनीत गोयंका आणि त्यांच्या पत्नीने आक्षेप घेतला. जर, यांना अशी नमाज पढण्याची परवानगी मिळत असेल तर, मी देखील इथे पूजा करू का? असा सवाल विनीत गोयंका यांनी उपस्थित केला. मुळात आपला आक्षेप नमाज पढण्याला नाही. विविध धर्मियांसाठी प्रार्थना करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली आहे. नेमून दिलेल्या जागेवर नमाज पढला गेला तर सर्वांची गैरसोय टळेल, हा आपला युक्तिवाद सीआरपीएफ जवानांनी मान्य केला नाही, असा गोयंका यांचा आरोप आहे. 



विशेष म्हणजे, विनीत गोयंका हे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या गव्हर्निंग काउंसिल आणि केंद्रीय नौकानयन मंत्रालयाच्या आय टी टास्क फोर्सचे सदस्य आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीशी थेट संबंधित असलेल्या व्यक्तीला आलेल्या अनुभवातून केल्या गेलेल्या आरोपांकडे राजकारणाच्या चश्म्यातून पाहिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, विनीत गोयंका यांनी मात्र आपण सर्वसामान्य प्रवासी म्हणून न पटलेल्या मुद्द्यावर निषेध नोंदवल्याचा दावा केला आहे.  




एअरपोर्टवर गोयंकांचे धरणे -

या सगळ्याचा निषेध करण्यासाठी गोयंका यांनी एअरपोर्टवर धरणे केले. यामुळे त्यांचे विमानदेखील चुकले. विशेष म्हणजे त्यांच्या या धरणे आंदोलनाचे त्यांच्या पत्नी चित्रिकरण करत होत्या तेव्हा जवानांनी त्यांना दादागिरी करत रोखल्याचा आरोप गोयंका यांनी केला.


केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र -


दरम्यान, या सगळ्या प्रकाराबाबत गोयंका यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहिले असून, याबाबत त्यांनी सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांना देखील पत्र लिहिले आहे. या बाबत सीआयएसएफची प्रतिक्रिया आलेली नाही.

जर विमानतळावर नमाज पढण्यासाठी वेगळी जागा आहे तर गँगवेमध्ये नमाज का पढली जात आहे?  मी प्रत्येक धर्माचा आदर करतो.  सर्वांना समान हक्क मिळायला हवेत, एवढीच माझी मागणी आहे. विमानतळावर नमाज पढतानाचे रेकॉर्डिंग माझी पत्नी आपल्या मोबाईलमधून करत होती. परंतु तो मोबाईल सीआयएसएफ जवानांनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.


विनीत गोयंका, प्रवासी



हेही वाचा - 

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ की सोन्याची खाण?

मुंबई विमानतळावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवा - शिवसेना


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा