Advertisement

बिनविरोध राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांचा 'पॉवर'गेम, पवारांच्या नावाला शिवसेनेचे समर्थन


बिनविरोध राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांचा 'पॉवर'गेम, पवारांच्या नावाला शिवसेनेचे समर्थन
SHARES

राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात आपला प्रभाव टाकणारे नेता, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एक खेळी खेळली आहे. देशाच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे. सोलापुरात एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विरोधी पक्षातल्या नेत्यांशी सुसंवाद साधण्याची अपेक्षा व्यक्त केली. ‘राजकीय योगायोग’ म्हणजे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून शरद पवार हे सक्षम नेता असल्याचे मत शिवसेना प्रवक्ता आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत मांडले आहे. राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांच्या नावावर सहमती झाली तर भाजपानं त्यांच्या उमेदवारी मान्य करावी, असा सल्लाही राऊत यांनी दिला आहे.

शरद पवार यांनी याआधी आपण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचा दावा केला होता. पण आता राजकीय चातुर्य दाखवत राष्ट्रपतीपदासाठी आपले नाव पुढे कसे येईल, याची तजवीज करताना ते दिसत आहेत. डाव्या पक्षांची मोट बांधू पाहणाऱ्या नेत्यांनी शरद पवार यांचे नाव राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातच महाराष्ट्रातल्या खासदार आणि आमदारांचे उत्तम संख्याबळ राखणाऱ्या शिवसेनेने शरद पवार यांचे नाव स्पर्धेत आणण्याचा प्रयत्न केला आहे. हे करत असताना संजय राऊत यांनी राष्ट्रपतीपदासाठी आपल्या पक्षाची पहिली पसंती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हेच असल्याचा सावध पुनरुच्चार केला आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) च्या नवी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय सर्व घटकपक्षांनी घेतला होता. शिवसेनाही याला अपवाद नाही. मात्र, यापूर्वीही काँग्रेसच्या शासनकाळात अनुक्रमे प्रतिभाताई पाटील आणि प्रणब मुखर्जी या संयुक्त पुरोगामी दल (युपीए)च्या उमेदवारांना राष्ट्रपतीपदासाठी समर्थन देताना शिवसेनेने वेगवेगळे तर्क दिले होते, हा इतिहासही विसरता येणार नाही.

एकूण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचे वारंवार सांगणारे शरद पवार पुन्हा एकदा आखाड्यात उतरले आहेत. पवार यांनी आपले राजकीय कसब वेळोवेळी दाखवून दिले आहेच. शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपले महत्त्व वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेतच. पवारांच्या एंट्रीमुळे हा 'पॉवर'गेम रंगतदार झाला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा