दादर - मुंबईतल्या जमिनी बिल्डर-उद्योगपतींच्या घशात घातल्या. पण बाळासाहेबांच्या स्मारकासाठी यांना जागा मिळत नाहीत असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. तसेच बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची निवड करुन तो बंगला हडपण्याचा यांचा डाव असल्याचा घणाघात त्यांनी यावेळी केला. 25 वर्ष तुम्ही काय केलंत असा सवाल विचारत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. दादरच्या सभेत राज ठाकरे यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुण्यातील सभेवरून देखील चिमटे काढलेत. मुख्यमंत्र्यांचा कारभार पारदर्शक असल्यामुळे गर्दी दिसली नाही आणि त्यांना न बोलता परत जावं लागलं, शिवाय मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावरुन टीका करताना, नोटाबंदी फक्त सामान्यांकरता होती. बाकी भाजपाकडे नोटा आहेत, त्या देशभर फिरत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मुंबईतल्या सभेला दत्ता राऊळ मैदान मिळाले नाही कुणी कोंबड झाकल्याने उजडायचे रहात नाही असा टोला त्यांनी यावेळी लगावला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे भाजपकुमार थापाडे आहेत. हे राजकारणी म्हणजे व्यंगचित्र आहेत. त्यामुळे ते समोर येताच मला चित्र रेखाटावे वाटते. तसेच कुणी किती काम केलयं हे कुणी सांगत नाही फक्त हे करू ते करू अशी आश्वासने देतात. त्यामुळे मी जाहिरनामा वचननामा काढणार नाही. नाशिक महापालिकेत केलीली कामे जनतेला दाखवून मतं मागणार आहे असंही यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले.