हो नाही म्हणता म्हणता अखेर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या बुडाखालची खुर्ची सरकलीच. खरं तर आज ना उद्या हे होणारंच होतं, खुद्द निरूपम यांनाही त्याची जाणीव होती. मात्र मोडेन पण वाकणार नाही अशा हटवादी प्रवृत्तीचे निरूपम शेवटपर्यंत आपल्या प्रतिस्पर्धी गटाशी दोन हात करण्यात दंग राहिले. अखेर शाह-काटशाहाच्या खेळाचं बाळकडू अनुवांशिकपणे मिळालेले मिलिंद देवरा यांनी निरूपम यांचा पत्ता कापला. निरूपम यांची विकेट महिनाभर आधीच पडणं अपेक्षित होतं. मात्र काँग्रेस हायकमांडने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निरूपम यांना बाजूला सारत देवरा यांच्या पारड्यात वजन टाकलं. त्यामुळे ‘देर आये दुरूस्त आये’ या म्हणीनुसार देवरा यांच्या समर्थकांना आता हायसं वाटू लागलंय.
निरूपम काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मर्जीतले समजले जातात. त्यांच्याच आशीर्वादाने मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी त्यांना मिळाली. २०१५ पासून ते या खुर्चीला चिकटून होते. पण निरूपम यांना या संधीचं सोनं करता आलं नाही. याची खंत त्यांना आज ना उद्या वाटल्यावाचून राहणार नाही. वाचाळवीर निरूपम यांची खुर्ची जाण्यामागे तशी असंख्य कारणे आहेत. परंतु त्यातली २ महत्त्वाची कारणे त्यांच्या प्रामुख्याने अंगलट आली. त्यातील पहिलं कारण म्हणजे त्यांची संकुचीत होत गेलेली प्रतिमा आणि दुसरं कारण म्हणजे पक्षांतर्गत नेत्यांची ओढवून घेतलेली नाराजी.
मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी. सोबतच दिल्लीपाठोपाठ प्रसार माध्यमांचं लक्ष वेधून घेणारं सर्वात मोठं व्यासपीठ. त्यामुळे दिल्लीत डाळ शिजू शकली नाही, तरी फायनान्शियल रिसोर्स असलेल्या मुंबईवर होल्ड ठेवण्यासाठी काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांमध्ये होणारी काटाकाटीची लढाई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी काही नवी नाही. कारण गटातटाचं राजकारण हाच मुळात महाराष्ट्रात खुरट्या गवतासकट वाढलेल्या काँग्रेसचा गाभा समजला जातो. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद मिळालं नाही, तरी मुंबई काँग्रेसच्या (MRCC) अध्यक्षपदाची माळ गळ्यात घालून मिरवणं ही काँग्रेसमधील बेरक्या नेत्यांसाठी नेहमीच अभिमानाची बाब राहिलीय.
या बाबती सरस ठरले ते मिलिंद देवरा यांचे वडिल आणि माजी पेट्रोलियम मंत्री दिवंगत मुरली देवरा. त्यांनी थोडी थोडकी नाही, तर तब्बल २२ वर्षे मुंबई काँग्रेसवर राज्य केलं. देवरा १९८१ ते २००३ असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी तळ ठोकून होते. त्यांच्या एकछत्री अंमलामुळेच दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. परंतु १९९६ आणि १९९९ मध्ये जयवंतीबेन मेहता यांनी देवरांच्या साम्राज्याला हादरे दिल्यावर हा गड काँग्रेसच्या हातून निसटला. पुढे देवरा यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत गुरूदास कामत यांनी त्यांच्यावर कडी करत मुंबई काँग्रेसवर कब्जा केला. २००३ ते २००८ अशी ५ वर्षे ते या पदावर होते.
त्यानंतर साम-दामाचा सढळहस्ते वापर करणाऱ्या कृपाशंकर सिंह यांचा दबदबा वाढू लागल्यावर हे पद आपसूकच त्यांच्या हाती आलं. अर्थात यावेळस देवरा आणि सिंह यांचा गट कामत गटावर भारी पडला. कृपाशंकर सिंग २०११ पर्यंत अध्यक्षपदावर होते. ३ ते ४ वर्षे अध्यक्षपदावर राहिल्यावर आणि उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणात अडकल्यावर त्यांना काही काळ राजकारणातल्या मुख्य धारेपासून बाजूला व्हावं लागलं. पुढे सव्वा वर्षे हे पद रिकामचं होतं. या गॅपनंतर अॅड. जनार्दन चांदूरकरांच्या रुपाने मुंबई काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळाला. निरूपम खुर्चीवर येईपर्यंत ते या पदावर कायम होते.
मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचीत अध्यक्ष मिलिंद देवरा यांचं अभिनंदन करताना हे पद म्हणजे काटेरी मुकूट असल्याची प्रतिक्रिया निरूपम यांनी प्रसार माध्यमांना दिली. यावरूनच मागील काही महिन्यांपासून आपली खुर्ची वाचवण्यासाठी निरूपम किती आटोकाट प्रयत्न करत होते, याची जाणीव होते. खरं तर शिवसेनेतून इम्पोर्ट झालेल्या निरूपम यांना काँग्रेसच्या नेत्यांनी कधी आपलं मानलंच नाही. त्यामुळे नेहमीच सेक्युलर असल्याची टिमकी वाजवणाऱ्या निरूपम यांची इमेज बदलू शकली नाही.
मुंबई हे काॅस्मोपाॅलिटन शहर असल्याने एकेकाळी मराठीचा उदो उदो करणाऱ्या शिवसेनेलाही हिंदी भाषिकांना खांद्यावर उचलून घ्यावं लागतंय. त्यात धनदांडग्या गुजराती, मारवाडी, सिंधी-पंजाबी आणि दक्षिण भारतीयांचाही समावेश आहे. मात्र उत्तर भारतीयांची आयती व्होट बँक लाभलेल्या निरूपम यांना इतरांशी म्हणावं तसं जुळवून घेता आलं नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारींचे नेते अशीच त्यांची संकुचीत ओळख बनली. सर्वसमावेशक मुंबई काँग्रेसच्या दृष्टीने ही बाब सकारात्मक नक्कीच नव्हती. फेरीवाल्यांचा प्रश्नावर तर त्यांची आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातली जुगलबंदी साऱ्या देशाने बघितली.
प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अमिताभ बच्चन यांना जीएसटीचं समर्थन न करण्याचा दिलेला फुकटचा सल्ला, कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांची तुलना कुत्र्यासोबत करणं, पकोडा आंदोलना दरम्यान रस्त्यावर केलेला तमाशा, कांदिवलीत मनसैनिकांसोबत हमरीतुमरीवर उतरण्यासाठी फेरीवाल्यांना प्रोत्साहित करणं, अशा एक ना अनेक कारणांमुळे निरूपम यांनी वाद ओढावून घेतले. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांची इमेज सुधारण्याऐवजी आणखीच डागाळली.
काँग्रेसच्या मुखपत्रात सोनिया गांधी यांच्याच विषयी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर कामत गटाकडून निरुपम यांना हटवण्यासाठी उघडपणे विरोध सुरू झाला होता. परंतु, राहुल गांधी यांनी त्यांच्या मुंबई दौऱ्यात कामत शेजारी बसलेले असतानाच निरुपम यांना अभय दिल्याचं प्रसार माध्यमांना सांगितल्याने कामत प्रचंड नाराज झाले होते. मुंबई काँग्रेस अध्यक्ष म्हणून मनमानी कारभार करणाऱ्या निरुपम यांच्या विरोधात पक्षात प्रचंड असंतोष होता. यामध्ये देवरांसोबत कृपाशंकर सिंग, वर्षा गायकवाड, नसीम खान, प्रिया दत्त यांचा समावेश होता.
त्यातूनच मुंबई काँग्रेसमध्ये निरूपम विरूद्ध कृपाशंकर सिंग, गुरूदास कामत आणि मिलिंद देवरा असे ३ गट तयार झाले. निरूपम काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता काम करत असल्याचा आक्षेप देवरा गटाने केला होता. कामत यांच्या निधनानंतर उत्तर मुंबई ऐवजी उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी निरूपम यांनी पक्षाकडे केली होती. परंतु त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी कामत गटाकडून दबाव टाकण्यात येत होता.
त्यातच मुंबई काँग्रेसच्या कार्यकरिणीत निरूपम यांनी आपल्या २४ समर्थकांची वर्णी लावल्यावर कामत व देवरा गटाची चांगलीच आगपाखड झाली. पाठोपाठ अंतर्गत गटबाजीमुळे प्रिया दत्त आणि मिलिंद देवरा यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली. फेब्रुवारी महिन्यात कृपाशंकर सिंग आणि नसीम खान यांनी दिल्लीला जाऊन मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली आणि निरूपम यांना या पदावरून हटवण्याची मागणी केली. अखेर सुवर्णमध्य काढत काँग्रेसने मिलिंद देवरांकडे मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद देत निरूपम यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. खरं तर काँग्रेसने या खेळीतून एका दगडात दोन पक्षी मारले.
वडिलांच्या पराभवाचा वचपा काढत २००४ मध्ये पुन्हा एकदा दक्षिण मुंबईत काँग्रेसचं वर्चस्व प्रस्थापित करणारे मिलिंद देवरा यांचे इतर सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध आहेत. अध्यक्षपदी निवड झाल्यावर वर्षा गायकवाड आणि भाई जगताप यांच्यासोबत त्यांनी सिद्धिविनाक मंदिर, माहीम दर्गा तसंच चैत्यभूमीवर जाऊन दर्शन घेतलं. यातून मॅन मॅनेजमेंट कशी असते हे सुद्धा लागलीच दाखवून दिलं.
देवरा सोनिया आणि राहुल यांचे निकटवर्तीय समजले जातात. पण ही पुण्याई मुंबईत काम करताना त्यांच्या कामाला येईलच असं नाही. कारण भाजपाविरोधातील अटीतटीच्या लढाईत देवरा यांना आपल्या मतदारसंघासोबतच मुंबईतील इतर ५ मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांना देखील सपोर्ट द्यायचा आहे. निवडणूक अवघ्या महिन्याभरावर आलेली असताना देवरांना हे दुहेरी आव्हान पेलायचं आहे. यांत ते यशस्वी होतात की नाही हे निवडणुकीच्या निकालानंतरच दिसून येईल.
हेही वाचा-
एकच स्पिरीट, नो किरीट; सोमय्यांना शिवसेनेचा आक्रमक विरोध