अणुशक्ती नगरचे शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर शुक्रवारी उशीरा रात्री अज्ञात गुंडांनी तलवारीने हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यातून तुकाराम काते थोडक्यात बचावले. पण या हल्ल्यात त्यांच्या बाॅडीगार्डसह २ कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
तुकाराम काते यांनी मेट्रोच्या गैरकारभारावर मानखुर्द महाराष्ट्र नगर इथं काही दिवसांपूर्वी मेट्रोच्या साईटवर मोर्चा काढला होता. त्यानंतर मेट्रोचं काम करणाऱ्या कंत्राटदारांचे काही ट्रकही पकडून दिले होते. याच गोष्टीचा राग ठेवून मेट्रोच्या कंत्राटदाराने जीवे मारण्यासाठी गुंड पाठवल्याचा आरोप आमदार तुकाराम काते यांनी केला आहे.
महाराष्ट्र नगर मधील गरब्याचा कार्यक्रम संपल्यावर तुकाराम काते जवळच कार्यकर्त्यांसह बोलत उभे होते. त्याचवेळी काही गुंड हातात तलवारी घेवून तुकाराम काते यांच्या अंगावर धावून आले. मात्र तुकराम काते यांच्या बाॅडीगार्डने त्यांना वाचवलं.
हल्लेखोरांनी तलवारी आणि हाॅकीस्टीकचा धाक दाखवून घटनास्थळाहून पळ काढला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना कळवण्यात आलं. या जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेेले तुकाराम काते थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले. या गंभीर घटनेनंतर मानखुर्द परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
हेही वाचा-
सायबर चोरट्यांचा वकिलाला २७ हजारांना गंडा
शेअर मार्केट कोसळल्यानं वृद्धाने केली आत्महत्या