बोरिवली - आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईतील सुमारे ४० लाख झोपडीवासीयांना हक्काचं घर देण्याची स्वप्न पुन्हा दाखवण्यास भाजपनं सुरुवात केली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, रेल्वे आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवरील लाखो झोपडीधारकांना हक्काच्या घराचे स्वप्न साकारण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच निर्णय घेतला जाईल, असं मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी सोमवारी सांगितलं.
अॅड. शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने झोपडपट्ट्यांच्या प्रश्नासाठी केंद्र सरकारच्या दळणवळण, पर्यावरण, नगरविकास आणि रेल्वे या चारही विभागाचे मंत्री आणि सचिवांच्या नवी दिल्लीत सोमवारी भेटी घेतल्या. या शिष्टमंडळामध्ये शेलारांसोबत खासदार किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी, अतुल शहा, मनोज कोटक यांचा सहभाग होता.
संजय गांधी उद्यानाचे सुरक्षा क्षेत्र १०० मीटर करण्याचा निर्णय केंद्र सरकार लवकरच जाहीर करणार असल्याचा दावा शेलार यांनी केला आहे. हे क्षेत्र आधीच्या सरकारनं १० किमी केल्यानं मुलुंड, भांडुपसह परिसरातील हजारो झोपड्या आणि इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे.
या वेळी पर्यावरण मंत्री अनिल दवे यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. हे क्षेत्र १०० मीटर करण्याची घोषणा लवकरच करण्याचे आश्वासन त्यांनी दिलं आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेतील झोपड्या आणि इमारतींच्या पुनर्विकासाबाबत दोन आठवड्यात निर्णय घेतला जाणार आहे.