Advertisement

इंजिनाची दिशा 'यार्डा'कडे?


इंजिनाची दिशा 'यार्डा'कडे?
SHARES

मुंबई - महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची शिट्टी वाजण्यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनात बिघाड झालाय. मनसेचे एक धडाडीचे पदाधिकारी शिवसेनेच्या संपर्कात असल्याची विश्वसनीय सूत्रांची बातमी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणा-या या पदाधिका-यानं राज यांची ‘खळ्ळ-खट्याक’ घोषणा प्रत्यक्ष अमलात आणण्यात मोठा वाटा उचलला होता. या पदाधिका-याच्या पुढाकारानेच मनसेचे अनेक सांस्कृतिक उपक्रम रंगले. राज ठाकरे यांच्या मर्जीतल्या या पदाधिकाच्या शिवसेनेत जाण्यानं अनेकांच्या भुवया उंचावणार आहेत.

दरम्यान, मनसेचे माजी नगरसेवक प्रकाश (बबन) पाटणकर यांनी रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. पाटणकर यांची काही दिवसांपूर्वी मनसेच्या माहिम विभाग अध्यक्षपदावरुन तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती. पालिका निवडणुकीत पत्नीसाठी उमेदवारी मिळवण्याच्या पाटणकर यांच्या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता मावळली. त्यानंतर मनसेची साथ सोडण्याचा निर्णय त्यांनी अमलात आणला. पाच वर्षांपूर्वी झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीपूर्वी मनसेची शक्ती क्षीण झालेली आहे. या परिस्थितीत पक्षाचं इंजिन यार्डाच्या दिशेनं न सरकावं, याची विशेष काळजी मनसे अध्यक्षांना घ्यावी लागणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा