राज्यभरात २१ ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपातील वाद सुटण्याची शक्यता आहे. कारण या युतीच्या जागावाटपात शिवसेनेने मागितलेल्या १३० जागांपैकी ११८ जागा देण्याचं निश्चित झालं आहे. परंतु, बाकी १२ जागांपैकी कोणत्या आणि किती जागा द्यायच्या यावर भाजप आणि शिवसेनेमध्ये निर्णय प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईतील वडाळा, शिवाजी नगर- मानखुर्द, ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर या जागांबरोबर विदर्भातील देवळी, रिसोड, गोंदिया तर पश्चिम महाराष्ट्रातील माण, वाई, अक्कलकोट, पंढरपूर, फलटण, कागल आदी जागांपैकी काही जागा शिवसेनेला पाहिजेत. यामधील शिवाजीनगर-मानखुर्दची जागा शिवसेनेला देण्यास भाजप तयार आहे. परंतु, अन्य जागा सोडण्यास भाजप तयार नासल्याचं समजतं.
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, युतीतील जागावाटपाचा वाद काही सुटत नव्हता. परंतु, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर शिवसेना-भाजपच्या जागावाटपाच्या चर्चेला उधाण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास चर्चा झाली असून यामध्ये शिवसेनेनं १३० जागांची यादी भाजपला दिली आहे.
या यादीतील ११८ जागा शिवसेनेला देण्याबाबत भाजप तयार असून, त्या जागांचा वाद संपलेला आहे. उर्वरित १२ जागांबाबत या दोन पक्षांमध्ये अद्याप चर्चा सुरू आहे.
हेही वाचा -
अंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल तयार झाल्यास मुंबई क्रूझ पर्यटनाची राजधानी
मुंबई विद्यापीठामार्फत माजी विद्यार्थ्यांचा सन्मान