मुंबई - देशातल्या सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या तिजोरीच्या किल्ल्या कुणाकडे जातात? या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. किल्ल्या ताब्यात घेण्याची जय्यत तयारी मात्र सुरु झाली आहे. मुंबईच्या महापौरपदावर कोण आरुढ होणार? हे जाणून घेण्याइतकीच स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते? याबाबत राजकीय विश्लेषकांइतकीच सर्वसामान्यांच्या मनातही उत्सुकता आहे.
शिवसेनेला महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी समर्थन देताना त्यांचा महापौरपदावरचा दावा मान्य करायचा आणि बदल्यात तिजोरीच्या किल्ल्या म्हणजेच स्थायी समितीचं अध्यक्षपद आपल्या पक्षाकडे खेचून घ्यायचं, अशी रणनीती भाजपाच्या नेत्यांनी आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत ‘दक्ष’ राहत जुळवून घेण्याचा पवित्रा घेतला आहे.
पंतप्रधानांच्या सूचनेचं पालन करत फडणवीसांनी शिवसेनेशी तडजोडीचा पर्याय खुला ठेवला असला तरी कोणत्याही परिस्थितीत सन्मानाबाबत ‘तडजोड’ करायची नाही, ही भाजपाची भूमिका आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या नगरसेवकांनीसुद्धा स्थायी समिती अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावून ठेवली आहे. महापौरपदाची सतत हुलकावणी मिळालेले यशवंत जाधव यांची सभागृहनेतेपदाच्या पलीकडे झेप जाण्याची शक्यता मावळली आहे.
अनेक ज्येष्ठ नगरसेवक महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्ष यापैकी कोणत्याही पदासाठी वर्णी लावून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. शिवसेनेच्या महिला नगरसेवक तर याकामी पदर खोचून कामाला लागल्या आहेत. याआधी शिवसेनेनं तृष्णा विश्वासराव यांना सभागृहनेतेपदाची जबाबदारी सांभाळण्याची संधी दिली होती. या निवडणुकीत तृष्णा विश्वासराव पराभूत झाल्यामुळे सभागृहात नगरसेविका म्हणून प्रवेश करण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं. महापौर, सभागृहनेता पदांवर महिलांना संधी देणाऱ्या शिवसेनेनं पालिकेच्या इतिहासात आजवर स्थायी समिती अध्यक्षपदावर मात्र एकाही नगरसेविकेला संधी दिलेली नाही.
यंदा हे चित्र बदलण्याचा चंग पक्षाच्या नगरसेविकांनी बांधला आहे. शुभदा गुडेकर, राजूल पटेल, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, किशोरी पेडणेकर या शिवसेनेच्या जुन्या जाणत्या ‘जाऊ बाई जोरात’ च्या त्वेषाने स्थायी अध्य़क्ष बनण्यासाठी आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी करत आहेत. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, काही नगरसेविका आपला दावा पक्का करण्यासाठी साक्षात शिवसेनेच्या ‘वहिनीसाहेबां’च्या सतत संपर्कात आहेत. तूर्त स्थायी समिती अध्यक्षपदाची तुरी बाजारातच आहे. पण शिवसेनेचे शिलेदार मुख्यत्वे रणरागिणी गाफील राहत प्रतिस्पर्ध्याला चाल खेळण्याची संधी मिळणार नाही, याची काळजी घेताना दिसत आहेत.