Advertisement

तिकीटांवरील सवलतींसाठी प्रयत्नशील- मुनगंटीवार


तिकीटांवरील सवलतींसाठी प्रयत्नशील- मुनगंटीवार
SHARES

मराठी नाटक आणि सिनेमांच्या 250 रुपयांच्या तिकीटांसाठी असलेली सवलतीची मर्यादा 500 रुपयांपर्यंतच्या तिकीटांसाठी करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

मराठी चित्रपट आणि नाट्य व्यावसायिकांच्या वस्तू आणि सेवा करा (जीएसटी) संबंधीच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत अर्थमंत्र्यांनी हे आश्वासन दिले. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे हे देखील यावेळी उपस्थित होते.


नाटकांच्या तिकिटावर 18% जीएसटी

मराठी नाटकांच्या तिकीटांवर 18 टक्के जीएसटी लावण्यात आला असून, यातील 9 टक्के वाटा केंद्र सरकारला आणि 9 टक्के वाटा राज्य सरकारला मिळणार आहे. राज्य सरकारच्या वाट्यातून सवलत देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. याबाबत विचार करण्याचे आश्वासनही मुनगंटीवार यांनी दिले.


सर्व जिल्ह्यात नाट्यगृहे

मराठी चित्रपटांच्या तिकीटांच्या किमतीवरची कॅप उठविण्याची मागणी तपासून त्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यात येईल तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नाट्यगृहे उभारण्यासाठी राज्यसरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईतील भारतमाता सिनेमागृह अत्याधुनिक करण्यात येईल, असेही आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी चित्रपट व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाला दिले.



सर्वाधिक मनोरंजन कर महाराष्ट्रातून

सर्वात जास्त मनोरंजन कर महाराष्ट्रातून मिळतो, असे सांगून मुनगंटीवार यांनी याविषयी विविध प्रस्तावांवर वस्तू आणि सेवा कर परिषदेसमोर बसून, चर्चा करण्यात येईल आणि त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

नाट्य, चित्रपट, लोककला, असा सांस्कृतिक वारसा, जतन करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर कायद्यात आवश्यक बदल करण्याचे प्रयत्न करण्याबाबत राज्यशासन प्रयत्नशील आहे.


करमाफ करणे हे उद्योजकांसाठी नसून, ते सामान्य ग्राहकांसाठी आहे. अशा करातून राज्यातील सांस्कृतिक केंद्र विकसीत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.
विनोद तावडे, सांस्कृतिक मंत्री

यावेळी नाट्यसृष्टीतील अशोक हांडे, चंद्रकांत लोकरे, प्रसाद कांबळी, कौस्तुभ त्रिवेदी, अमी त्रिवेदी, मराठी चित्रपट निर्माते नितीन वैद्य, निखील साने, मंगेश कुलकर्णी, महेश टिळेकर, वैजयंती आपटे आदी दिग्दर्शक-निर्मात्यांची उपस्थिती होती.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा