मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत ब्रेकअप केल्यानंतर मनसे शिवसेनेसोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत युती करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र मनसेला टाळी देण्यास शिवसेना तयार नाही. त्यामुळे आता मनसे भाजपाला टाळी देणार का याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.
शिवसेनेने भाजपासोबत युती तोडल्याचं जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला टाळी देण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. शत प्रतिशत दावा करणाऱ्या भाजपाने आता 227 जागा लढण्याचा निर्धार केला आहे. मात्र शिवसेनेने साथ सोडल्यानंतर भाजप राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याची चर्चा जोरदार सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र काँग्रेस पक्षाकडून आघाडीची शक्यता नसल्यामुळे अस्तित्वाच्या लढाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा प्रस्ताव स्वीकारला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनसेकडून शिवसेनेसोबत युती करण्याची चर्चा आहे. पण युतीची चर्चा ही केवळ अफवाच असल्याचे स्पष्टीकरण मनसेच्या वतीने देण्यात आलं आहे. मनसे ही युतीच्या टाळीसाठीच थांबली असून आता ते शिवसेनेसोबत युती करणार की भाजपासोबत असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. दरम्यान भाजपाची मनसेसोबत छुपी युती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मनसेच्या विद्यमान आणि बालेकिल्ला असलेल्या भागात भाजपाचे कच्चे उमेदवार देवून मनसेला साथ दिली जाणार आहे. तर उर्वरीत प्रभागात मनसेने चांगले उमेदवार देवून शिवसेनेची मते फोडून भाजपाला मदत करण्याची रणनीती आखली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेचे दिवाकर रावते आणि भाजपचे मुंबई प्रवक्ते निरंजन
शेट्टी यांनी मुंबइ लाईव्हच्या 'उंगली उठाओ' मोहिमेसाठी मुंबई लाइव्हच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी मनसेच्या टाळीबाबत विचारलेल्या प्रश्नावर दोघांनीही उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याचं दिसून आलं.