मुंबईसह राज्यभरात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर असताना आणखी २९३ अनधिकृत गृहप्रकल्पांचं राजरोसपणे काम सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईसह राज्यभर हे २९३ अनधिकृत गृहप्रकल्प पसरले असून महारेरानं या प्रकल्पांचा पर्दाफाश केला आहे. या प्रकल्पांची गंभीर दखल घेत त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश महारेरानं संबंधित यंत्रणांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
१ मे २०१७ पासून राज्यात महारेरा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानुसार वर्षभरात अर्थात ३० एप्रिल २०१८ पर्यंत महारेराकडे ९०३८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी ७३२८ तक्रारी वैध होत्या, तर उर्वरित तक्रारी अवैध होत्या. ७०६ गृहप्रकल्पांविरोधातील या तक्रारी होत्या आणि त्यातील २४७ प्रकल्पांना नोंदणीची गरज नव्हती. ७७ प्रकल्पांविरोधात दंडात्मक कारवाई करत त्यांची नोंदणी करून घेण्यात आली आहे. तर ८९ प्रकल्पांची अद्याप नोंदणीच झालेली नाही.
या सर्व तक्रारींचा अभ्यास करताना, सुनावणी करताना समोर आलेली धक्कादायक बाब म्हणजे यातील २९३ प्रकल्प अनधिकृत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरातील हे २९३ प्रकल्प असून महारेरानं नगरविकास, महानगर पालिका, जिल्हाधिकारी आणि नगरपालिकांना कारवाईसंदर्भात नोटीसा पाठवल्या आहेत.
या नोटिशीनुसार अनधिकृत प्रकल्पांविरोधात नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश महारेरानं दिले आहेत. त्यामुळे आता या यंत्रणा नेमकी काय कारवाई करतात? आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना लगाम लागतो का? याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा
ओसी, घराचा ताबा घेतला नसेल तर मेंटेनन्सचं टेन्शन विसरा!