आठवड्यातील पहिल्याच दिवशी सोमवारी देशातील शेअर बाजार (share market) घसरून बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (bse sensex) १८९ अंकांनी घसरून ५२,७३५ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (nse nifty) ४५ अंकांंची घट नोंदवत १५,८१४ वर स्थिरावला.
सोमवारी सेन्सेक्स (sensex) आणि निफ्टी (nifty) विक्रमी पातळीवर उघडले. निफ्टी ५५ अंकांनी वधारून १५,९१५ वर तर सेन्सेक्स १०० अंकांनी वाढून ५३,१२६ वर उघडला. मात्र, सुरूवातीची तेजी तासाभरातच निर्देशांकांनी गमावली. वरच्या पातळीवर झालेल्या नफा वसुलीमुळे सेन्सेक्स, निफ्टी घसरले. निफ्टी तर १५,८०० पर्यंत आला होता. मात्र, छोट्या व मध्यम शेअर्समध्ये झालेल्या चांगल्या खरेदीमुळे बाजार सावरले. निफ्टी मिड कॅपने ०.५३ टक्के आणि स्मॉल कॅपने ०.३७ टक्के वाढ नोंदवली.
एचडीएफसी लाइफ, टायटन, टीसीएस, श्री सिमेंट, कोल इंडिया आरआयएल, एचसीएल टेक आणि भारती एअरटेल या शेअर्समध्ये विक्री राहिली. तर डॉ. रेड्डीज, हिंडाल्को, टाटा स्टील, दिवी लॅब, टेक महिंद्रा, ओएनजीसी, सन फार्मा आणि एचयूएल आदी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून आठ महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी विविध उद्योगांना मिळून तब्बल ६ लाख २८ हजार ९९३ कोटींची घोषणा केली आहे. सीतारमण यांनी जाहीर केलेली आर्थिक सवलत तेजीला चालना देईल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -
पॅन कार्ड हरवलंय, खराब झालंय? असं मिळवा नवीन पॅन कार्ड
रिलायन्सनं गुगलसोबत मिळून लॉन्च केला जियोफोन नेक्स्ट, १० सप्टेंबरपासून होणार विक्री