बोरीवली - बोरीवलीहून चिपळूणकडे जाणारी एसटी फलाट क्रमांक 1 वर थांबेल...माफ करा..फलाट क्रमांक 2 वर थांबेल..किंवा कुठेही थांबू शकेल...चक्रावलात ना? पण गोरेगावच्या एस.व्ही. रोडवर जर एसटीनं अनाऊन्समेंट करायची ठरवली तर अशीच करावी लागेल..कारण या एकाच स्टॉपवर चक्क दोन एसटीस्टॅण्ड प्रवाशांसाठी सज्ज आहेत..आणि तेही एकमेकांपासून अगदी काही फुटांवर...
यातला एक स्टॉप आहे मुंबईचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी बांधलेला तर दुसरा आहे राज्यमंत्री आणि भाजप नेत्या विद्या ठाकूर यांनी बांधलेला.. दोन्ही स्टॉप म्हाडाच्या निधीतूनच बांधण्यात आले आहेत. यावर सत्ताधारी शिवसेनेनं आपली बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केलाय.
यासंदर्भात भाजप नेत्या विद्या ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्या प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. शिवाय त्यांच्या पक्षाकडून याबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आला
आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी बांधलेले हे दोन बसस्टॉप राजकीय अर्थ काढण्यासाठी पुरेसे आहेत. शिवाय एकाच ठिकाणच्या दोन बसस्टॉपसाठी म्हाडानेही निधी कसा दिला हाही प्रश्न आहेच..त्यामुळे आता इथून एसटी पकडताना कोणत्या स्टॅण्डवर उभं रहायचं हे तुम्हीच ठरवा.