कोकण रेल्वे कॉर्पोरेशन (Konkan Railway zone) अंतर्गत राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदुरे रेल्वे स्थानकापर्यंत एकूण 37 रेल्वे स्थानके आहेत. या रेल्वे स्थानकांना मेन लाइनला जोडणाऱ्या अप्रोच रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचे लवकरच मेकओव्हर केले जाणार आहे.
रेल्वे स्थानक परिसराचेही व्यापक सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या संदर्भात कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. त्यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
कोकणच्या पर्यटन स्थळांची ख्याती देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी येथील पायाभूत सुविधांचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील रस्ते विकसित केले जातील, ज्यामुळे पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परस्पर सहकार्याने ही सर्व कामे वेगाने पूर्ण होतील आणि कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने लवकरच फायदा होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोकण रेल्वे स्थानकांपर्यंत पोहोचणाऱ्या रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती आणि परिसराचे सुशोभीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्यांची 10 वर्षे देखभाल व दुरुस्ती केली जाणार आहे. हा सामंजस्य करार भविष्यात ३० वर्षांपर्यंत वाढवण्याची तरतूद करण्यात आली आहे.
हेही वाचा