कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुविधा पुरवली. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून एसटी महामंडळाने तसेच कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. या लाटेदरम्यान महाराष्ट्रात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळं उपनगरीय लोकल ट्रेन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आली होती. तसेच मुंबईत बेस्ट सोबतच एसटी महामंडळाच्याही काही गाड्या धावत होत्या. आता या गाड्यांची सेवा १४ जूनपासून थांबवण्यात येत असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी ट्विटरद्वारे सांगितले आहे.
महाराष्ट्रात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे उपनगरीय लोकल ट्रेन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आलेली आहे. याचा सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी बेस्टच्या साथीला एसटी बसेस मुंबईत धावत होत्या. यासाठी महाराष्ट्राच्या महामंडळाचे कानाकोपऱ्यातील कर्मचारी सेवा देत होते. ही सेवा सोमवारपासून थांबवण्यात येत आहे, असे अनि परब यांनी सांगितले.
परगावांहून येऊन मुंबईसाठी सेवा देणाऱ्या सर्व चालक, वाहक व व्यवस्थेतील कर्मचारी अधिकाऱ्यांचे त्यांनी आभारही मानले. तुमच्या अशा सेवेमुळेच एस. टी. चा सन्मान व विश्वास आजही टिकून आहे, असे अनिल परब यांनी म्हटलं. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही मुंबई तसेच उपनगरांत प्रवास करण्यासाठी लोकल सुरु करण्यात आलेल्या नाहीत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, तसेच सरकारी कर्मचारी वगळता कोणालाही लोकमधून प्रवास करण्यास मुभा नाही. या पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाच्या अतिरिक्त गाड्यादेखील १४ जूनपासून बंद होत आहेत.