Advertisement

सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरू होणार?

मुंबईत कोरोनाची लाट ओसरली असून, रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं सध्या सर्वांनाच लोकल कधी सुरु होणार याची प्रतिक्षा लागली आहे.

सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरू होणार?
SHARES

मुंबईत कोरोनाची लाट ओसरली असून, रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं सध्या सर्वांनाच लोकल कधी सुरु होणार याची प्रतिक्षा लागली आहे. अद्याप लोकलनं प्रवास करण्याची परवानगी मिळत नसल्यानं अनेक चाकरमान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, खासगी वाहतुकीनं प्रवास करण्यासाठी प्रवाशांना खिसा रिकामा करावा लागत आहे. त्यामुळं मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोना संपल्याशिवाय मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होणार नाही असं स्पष्ट सांगितलं आहे. दरम्यान महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनीही लोकल इतक्यात सुरू करण्याबाबत असमर्थता दर्शवली होती. लोकल सुरू करताना ती टप्प्याटप्प्याने म्हणजेच आधी महिलांसाठी किंवा विशिष्ट कर्मचाऱ्यांसाठी अशा पद्धतीने सुरू केली जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मात्र मुंबईत रुग्णसंख्या कमी होत असली तरी टप्पा तीनचेच निर्बंध सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने लोकलने प्रवास करण्यासाठी वाट पहावी लागणार असल्याचं स्पष्ट आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मुंबईत सोमवारपासून सध्याच्या निर्बंधांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. राज्य सरकारच्या निकषांनुसार मुंबईचा समावेश आता टप्पा एकमध्ये झालेला असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळं सावधगिरीचा उपाय म्हणून पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी टप्पा तीनचेच निर्बंध सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील २ महिन्यांपासून लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यासाठी राज्य सरकारने दोन आठवडय़ांपूर्वी निकष तयार केले होते. तेव्हा मुंबईत बाधितांचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा जास्त होते. मात्र २ आठवड्यांनी मुंबईतील परिस्थिती सुधारत असून कोरोनाबाधितांचे प्रमाण घटले आहे. असे असले तरी मुंबईला तिसऱ्या टप्प्याचेच निर्बंध लागू करण्याचे पालिकेने ठरवले आहे. त्यामुळं दुकाने, आस्थापना, खासगी कार्यालये यांच्यावर सध्याचेच निर्बंध राहणार आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा