
पावसाळ्यानंतरच्या कामानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (मुंबई विमानतळ) दोन्ही धावपट्ट्या मंगळवार, १८ ऑक्टोबरला सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे काही कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली आहेत तर काही विमानांच्या उड्डाणाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
मुंबई विमानतळावर १४/३२ आणि ०९/२७ अशी मुख्य तसेच पर्यायी धावपट्टी आहे. ही धावपट्टी येत्या मंगळवारी देखभालीच्या कामांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवली जाणार आहे, अशी माहिती मुंबई विमानतळ प्रशासनाने दिली आहे.
सायंकाळी पाचनंतर पुन्हा धावपट्टी विमानांसाठी खुली केली जाईल. धावपट्टीच्या बाजूला असलेल्या दिव्यांची दुरूस्ती, एरोनॉटिकल ग्राउंड दिव्यांमध्ये बदल यांसारखी प्रमुख कामे या कालावधीत केली जातील. या कामांमुळे प्रवाशांनी आरक्षित केलेल्या विमान सेवांबद्दल संबंधित विमान कंपन्यांकडून माहिती घ्यावी, असे आवाहन मुंबई विमानतळ प्रशासनाने केले आहे.
यापूर्वी दोन्ही धावपट्ट्या पावसाळापूर्व कामांसाठी १० मे रोजी सहा तास बंद ठेवण्यात आल्या होत्या. सध्या दररोज ८०० हून अधिक विमाने मुंबई विमानतळावर उतरतात आणि उड्डाणे करतात. मुंबई विमानतळावर देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानांची वर्दळ वाढली असून प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे. या विमानतळावर सर्वाधिक, १ लाख ३० हजार ३७४ प्रवाशांची नोंद १७ सप्टेंबर रोजी झाली होती.
हेही वाचा
