मुंबईची लाइफलाइन अर्थात उपनगरीय लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरू करण्याबाबत आता नवीन वर्षाचा मुहूर्त काढण्यात येत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या तारखेपासूनच सर्वांसाठी लोकल ट्रेनची दारं खुली होतील, असे संकेत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
विधान भवन परिसरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी मुंबई लोकल ट्रेनबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. याबाबत बोलताना ते म्हणाले, मागील ८ महिन्यांपासून लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल ट्रेनने प्रवास करण्यास मुभा देण्यात आलेली आहे. मात्र यामुळे हातावर पोट असणाऱ्यांची मोठी अडचण होत असल्याची सरकारला जाणीव आहे. लोकल पूर्ण क्षमतेने तसंच सर्व प्रवाशांना घेऊन धावत नसल्याने एकप्रकारे मुंबईच्या महत्त्वपूर्ण वाहतूक व्यवस्थेलाही ब्रेक लागलेला आहे. ही परिस्थिती बदलण्याचा सरकारचा प्राधान्यक्रमाने विचार करत आहे.
हेही वाचा- लोकल सुरू केल्यावर कोरोनाचा त्रास नाही पण..? सुधीर मुनगंटीवार संतापले
शहरातील कोरोनाचं संकट हळुहळू कमी होत असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देखील आटोक्यात येत आहे. मुंबईच्या (mumbai) लोकल ट्रेनमधून प्रवास करताना मोठी गर्दी होते. सावधगिरी न बाळगल्यास लोकल ट्रेन कोरोना विषाणूची मोठी वाहक ठरू शकते. त्यामुळे गर्दी कशी नियंत्रणात ठेवता येईल, मास्क न घालता कुणीही लोकल ट्रेनमध्ये चढणार नाही, यासाठी पोलीस आणि इतर किती मनुष्यबळ लागेल, याची चाचपणी पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळे नवीन वर्षात लोकल नक्कीच सुरू होऊ शकते. एवढंच नाही, तर नव्या वर्षाच्या पहिल्या तारखेपासूनच लोकल ट्रेनमधून सर्व प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
राज्य सरकारने अनलाॅक करताना सुरूवातीच्या टप्प्यात मर्यादीत लोकल ट्रेनच्या फेऱ्यांसह केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच पश्चिम आणि मध्य रेल्वेने (western railways and central railways ) प्रवास करण्यास मुभा दिली होती. त्यानंतर आवश्यकतेनुसार लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासोबतच काही ठराविक चाकरमान्यांना देखील लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. परंतु सर्वसामान्य प्रवासी मात्र अजूनही परवानगीच्या प्रतिक्षेतच आहेत. त्यातच लोकल ट्रेन दिवाळीनंतर, १५ डिसेंबरनंतर सर्वांसाठी चालवण्यात येईल, अशा चर्चा सुरू असतानाच शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली. त्याचप्रमाणे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून लोकल ट्रेन सुरू करण्याचा विचार पुढे ढकलण्यात आला.
सद्यस्थितीत एसटी, बेस्ट बस, टॅक्सी-रिक्षा आणि खासगी वाहनांचीच प्रवासासाठी उपलब्धता असल्याने रस्ते वाहतुकीवर ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेन सुरू झाल्यास सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकेल.