गेल्या नऊ दिवसांपासून ओला, उबरच्या चालक-मालकांनी पुकारलेला संप मंगळवारी मागे घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. कारण सोमवारी झालेल्या बैठकीत अॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालकांच्या सुमारे ८० टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. मात्र, काही मुद्द्यांवर अजूनही तोडगा न निघाल्याने बुधवारी देखील ओला, उबर सेवा प्रवशांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.
मागील नऊ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने संपाची हाक दिली होती. मागण्या मान्य होत नसल्यामुळे संपावर तोडगा काढण्यासाठी संघाचे अधिकारी आणि ओला-उबर व्यवस्थापनाचे प्रतिनिधी यांच्यात सोमवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये ओला आणि उबरच्या चालक-मालकांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.
प्रति किलोमीटर दरात अनुक्रमे १२, १५ आणि १९ रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रति किलोमीटरमागे आता या कंपन्यांकडून कमिशन आकारण्यात येणार नाही. त्याचबरोबर कंपनीने ‘लीज कॅब’ न घेण्याबाबतची मागणीदेखील मान्य केली आहे. या मागण्या ओला-उबर व्यवस्थापनाने मान्य केल्या आहेत. मात्र, काही मुद्द्यांवर तोडगा निघाला नसल्यामुळे सलग दहाव्या दिवशीसुद्धा ओला, उबरच्या चालक मालकांचा संप सुरूच आहे.
ओला, उबरचे व्यवस्थापन आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांध्ये मंगळवारी रात्री ३ वाजेपर्यंत बैठक झाली. या बैठकीत ८० टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या. परंतु, काही मुद्द्यांवर अजून तोडगा निघालेला नाही. आता या मुद्दयांवर गुरुवारी दुपारी ३ वाजता पुन्हा बैठक होणार आहे. मात्र, ही बैठक होईपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं संघाचे सचिव सुनील बोरकर यांनी सांगितलं.
आपल्या विविध मागण्यासाठी गेल्या नऊ दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे नियमीतपणे ओला, उबर या टॅक्सीसेवेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना गेले दहा दिवस सार्वजनिक वाहनांनीच प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारी होणाऱ्या संघाच्या आणि ओला, उबर व्यवस्थापनाच्या बैठकीत या संपावर तोडगा निघणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.