सीएसटी - मुबंई उपनगरात रेल्वे स्थनकाबाहेर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचे अतिक्रमाण होत आहे. त्यामुळे प्रवाशांना रोज ये-जा करताना नाहक त्रास होतो. याशिवाय रेल्वे प्रशासनाला विकासकामे करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र आता या अनधिकृत अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच रेल्वे हद्दीतील अतिक्रमणांची पाहणी आणि त्यांचे चित्रीकरण मंगळवारपासून केले जाणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी दिली. हे चित्रीकरण राज्य सरकार आणि त्या-त्या हद्दीतील स्थानिक सरकारी कार्यालयांना देण्यात येईल. त्यानंतर अतिक्रमणांवर कारवाई करण्याची प्रशासनाकडे विनंती केली जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन हे मुबंई भेटीला आले असून त्यांनी तिन्ही मार्गांवरील तांत्रिक कामाचा आढावा घेऊन स्थानकांची पाहणी देखील केली. सीएसटी येथील मुख्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रेल्वेवरील कामांसाठी वेळोवेळी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी बैठकीदरम्यान दिली.
फक्त
चित्रीकरण करून उपयोग नाही. तातडीने अंमलबजावणी झाली, तर आम्ही त्याचे स्वागत करू असे रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष शैलेश राऊत यांनी सागितले.