Advertisement

रो-रो सेवेला ५० टक्केच प्रवाशांचा प्रतिसाद

शहरानजीकच्या पर्यटनाला चालना मिळत असताना रो-रो सेवेचा प्रतिसाद मात्र अद्यापही सरासरी ५० टक्क्यांच्या आसपासच आहे.

रो-रो सेवेला ५० टक्केच प्रवाशांचा प्रतिसाद
SHARES

मुंबई ते अलिबाग प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रो-रो सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, अलिशान व आरामदायी अशा या रो-रो सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद अद्यापही सरासरी ५० टक्क्यांच्या आसपासच आहे. आठवड्याच्या शेवटच्या ३ दिवसांत या प्रतिसादात वाढ होत असली तरी तो एकतर्फीच राहत असल्याचं दिसून येते.

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबई-मांडवा-मुंबई या रो-रो सेवेची सुरुवात झाली. मात्र, लगेचच लॉकडाऊनमुळं ही सेवा ठप्प झाली. त्यानंतर गणेशोत्सवादरम्यान रो-रो पुन्हा सुरू करण्यात आली. त्यानंतर सुरुवातीच्या २ महिन्यांत रो-रो सेवेला सुमारे ४० टक्के प्रतिसाद होता. दिवाळीमध्ये त्यामध्ये फारशी वाढ जाणवली नाही. 

सध्या रो-रो सेवेला सरासरी ४५ ते ५० टक्के  इतकाच प्रतिसाद आहे. शुक्रवार-शनिवार-रविवार या दिवसांत त्यामध्ये थोडी वाढ दिसून येते. नाताळ आणि शनिवार-रविवारची जोडून आलेल्या सुट्टीमुळं, नववर्ष साजरे करण्यासाठी होणाऱ्या पर्यटनामुळं पुढील काही दिवसांमधील आगाऊ नोंदणीमध्ये १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली.

रो-रो सेवेला प्रतिसाद मिळत असला तरी प्रवाशांचा ओघ हा एकतर्फीच असतो. त्यामुळं सुट्टीच्या दिवसानुसार एका दिशेची प्रवाशांची गर्दी ही अत्यंत मर्यादित असते. गेल्या काही दिवसांमध्ये दुचाकीस्वारांचा प्रतिसाद काही प्रमाणात वाढल्याची माहिती समोर येत आहे. रो-रो सेवेची बहुतांश तिकिट विक्री ही आगाऊ नोंदणीनुसारच होत असून, सध्या दिवसाला ४ फेऱ्या सुरू आहेत. रो-रो सेवेमध्ये एका वेळी ५०० प्रवासी, १४० वाहनांना परवानगी आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा