Advertisement

रेल्वे स्थानकांतील पाणी देणारी 'ही' सुविधा अद्याप बंद


रेल्वे स्थानकांतील पाणी देणारी 'ही' सुविधा अद्याप बंद
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा प्रवासादरम्यान पाण्याची तहान लागते. त्यावेळी सहज पाण्याची तहान भागावी यासाठी रेल्वे स्थानकात वॉटर वेंडिंग मशिनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या वॉटर वेंडिंग मशिनच्या माध्यामातून प्रवाशांना एका रुपयांत शुद्ध पिण्याचे पाणी मिळतं. सद्यस्थितीत मात्र एका रुपयांत शुद्ध पिण्याचे पाणी या संकल्पनेवर उभारण्यात आलेले वॉटर वेंडिंग मशिन २० महिन्यांहून अधिक काळ बंद आहे.

मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर रेल्वे स्थानकातील सर्व सुविधा पूर्ववत करण्यात आल्या खऱ्या मात्र, तहान भागवण्यासाठी स्थानकावर स्वस्त आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने रेल्वे प्रवासी तहानलेलाच आहे.

एका रुपयात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होत असल्याने या मशीनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत होता. स्वयंचलित मशीनमध्ये ५ रूपयांचे नाणे टाकल्यास १ लिटर थंडगार पाणी मिळत होते. आता या पाण्यासाठी १५ ते २० रुपये मोजावे लागत आहेत.

सर्व मार्गावरील मशीन बंद

मध्य, हार्बर, पश्चिम आणि ट्रान्स हार्बर या सर्वच ठिकाणावरील वॉटर वेंडिंग मशीन बंद आहेत. यामुळे प्रवाशांना तहान लागल्यास त्यांना नाईलाजाने बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने या अडचणीची दखल घेत स्थानकांवरील पाणी पुरवणारी यंत्रणा पुन्हा एकदा कार्यान्वित करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयआरसीटीसीकडून वॉटर वेंडिंग मशीन सुरू करण्यात आल्या होत्या. कोरोना काळामुळे हे मशीन बंद करण्यात आले आहेत. अद्याप या सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. पुढील सूचना मिळेपर्यंत या मशीन बंद राहणार असल्याचं समजतं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा