वर्ल्ड बॅँकेनं मुंबईच्या ४७ वातानुकूलीत (एसी) लोकलसाठी निधी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळं पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना एसी लोकलसाठी आणखी वाट पहावी लागणार आहे. वर्ल्ड बॅँकेच्या नकारामुळे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) ने अाता इंडियन रेल फायनान्स कॉर्पोरेशन (आयआरएफसी) कडे मदत मागण्याचं ठरवलं आहे.
चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीत मुंबईतील एसी लोकलचं उत्पादन करण्यात येणार अाहे. १२ डब्यांच्या या एसी लोकलसाठी ३ हजार ४९१ कोटी रुपयांचा खर्च येणार अाहे. यामधील १ हजार ३०० कोटी रुपये वर्ल्ड बँकेकडून देण्यात येणार होते. मात्र, अाता वर्ल्ड बॅँकेनं नकार दिल्याने एसी लोकलसाठी प्रतिक्षा करावी लागणार अाहे. निधी न देण्याबाबतचं कारण मात्र वर्ल्ड बँकेकडून अद्याप सांगण्यात अालेलं नाही.
एमआरव्हीसीच्या एका अधिकाऱ्यानं याबाबत सांगितलं की, एसी लोकल विकत घ्यावी की भाडेतत्वावर घ्यावी यावर एकमत होत नव्हतं. तसंच एसी लोकलची निर्मिती देशात करण्यात यावी की लोकल परदेशातून खरेदी कराव्यात यावरुनही एकमत होत नव्हतं. त्याशिवाय वर्ल्ड बँकेने विरार – पनवेल कॉरिडोअरला प्राथमिकता दिली जावी, असं मत व्यक्त केलं होतं. मात्र, केंद्र सरकारने मंजूरी न दिल्यामुळं ते शक्य नसल्याचंही एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्याने सांगितलं. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते विरार दरम्यान एकच एसी लोकल धावत अाहे. या लोकलच्या दिवसाला या मार्गावर १२ फेऱ्या होतात.
हेही वाचा -
खुशखबर! पाच मिनिटांत येणार मेट्रो