Advertisement

BMC Election 2022 - मुंबई खड्डेमुक्त कधी होणार?

गेल्या काही वर्षांत मुंबई महापालिकेकडून रस्ते, त्यावरची डागडुजी यावर हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पण इतक्या वर्षांमध्ये मुंबई काही खड्डेमुक्त झाली नाही. यंदाही परिस्थिती जैसे थे आहे.

BMC Election 2022 - मुंबई खड्डेमुक्त कधी होणार?
SHARES

मुंबई महापालिकेच्या निवडणुका मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी आपली रणनीती आखण्यास सुरूवात केला आहे. तसंच, मुंबईकरांच्या समस्या जाणून त्यावर तातडीनं तोडगा काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व कार्यकर्ते व नेतेमंडळी कामाला लागले आहेत. निवडणुकीपुर्वी समस्या जाणून घेतात आणि त्या सोडवल्या जातात. परंतू, मुंबईकरांना असलेल्या मुख्य समस्या मिटणार असा प्रश्न मुंबईकरांना सतावत आहे. ही समस्या म्हणजे 'मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे'.

रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी मोठी तरतुद

दरवर्षी महापालिका अर्थसंकल्प जाहीर करते आणि मुंबईतील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी मोठी तरतुद करते. या तरतुदीनुसार मुंबईत रस्त्यांची दुरूस्तीही केली जाते. मात्र, पावसाळ्यात पुन्हा संबंधित परिसरातील परिस्थिती 'जैसे थे' होते. त्यामुळं अपघातांची शक्याता अधिक असते. रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळं होणारे अपघात लक्षात घेत अनेक मुंबईकर हे आपला जीव धोक्यात घालून गाडी चालवत असतात. याबाबत अनेकदा तक्रार करूनही महापालिका त्याकडे दुर्लक्ष करते आणि परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.

रस्त्यांवरील खड्ड्यांची पिढा

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची पिढा मुंबईकरांच्या पाठीशी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. अनेक वर्षे सरली, महापालिका निवडणुका झाल्या, लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकांना नगरसेवक निवडून दिले. मात्र आजपर्यंत ही समस्या काही सुटली नाही. विशेष म्हणजे मुंबई महापालिकाही गेली अनेक वर्ष खड्ड्यांमुळं होणारे अपघात टाळण्यासाठी व मुंबईला खड्डे मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे. नवनवीन उपाय योजना, विविध यंत्रणांचा वापर यासाठी केला जात आहे. मात्र महापालिकेचे हे प्रयत्न अक्षरश: फेल ठरत आहेत.

'हॉटमिक्स मटेरियल'

२०१६ पर्यंत मुंबई महापालिका खड्डे बुजवण्यासाठी 'हॉटमिक्स मटेरियल' वापरत होती. पण पावसाळ्यात त्याचा फारसा उपयोग होत नाही असं सांगत त्यांनी २०१७ मध्ये कोल्डमिक्स मटेरियल तंत्रज्ञान आणलं. त्यासाठी मुंबई महापालिकेनं १२५ कोटी रुपये खर्च केले. हॉटमिक्स मटेरियल हे गरम करून खड्यात भरलं जायचं. पण कोल्ड मिक्स मटेरियला गरम करण्याची गरज नसून पावसातही नीट भरलं जातं असा दावा मुंबई महापालिकेचा होता. परंतू, त्यावेळी महापालिकेचा हाही प्रयत्न फेल गेल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं.

दरवर्षीच्या अलिखित परंपरेनुसार याही वर्षी महापालिका कृपेने आणि शिवसेना आशिर्वादाने शहरातील रस्त्यांसाठी कोट्यवधींच्या तरतुदी करण्याचे सुनिश्चित करण्यात आले आहे. तेव्हा सर्व कंत्राटदारांनी आपापल्या निविदा आणि आवश्यक तो मलिदा घेऊन कंत्राटांची जहागिरी मिळविण्यासाठी महापालिकेकडे प्रस्थान करायला हरकत नाही.

जगभरात प्रसिद्ध असलेली मुंबई हीच का?

जागतिक दर्जाचे शहर म्हणून जगभरात आपला रुबाब मिरवणाऱ्या मुंबईतील खड्ड्यांची अवस्था पाहिली, तर जगभरात प्रसिद्ध असलेली मुंबई हीच का? असा प्रश्न निर्माण होईल, अशी शहरातील रस्त्यांची दैना आहे. मुंबईतील रस्ते बांधणी आणि वाहतूक प्रचालनासाठी मंहापालिका प्रशासनातर्फे या वर्षीच्या अर्थसंकल्पात सुमारे २२०० कोटींची तरतूद केली आहे.

शहरातील खड्डे हा सत्ताधाऱ्यांसाठी जरी राजकारणाचा विषय असला तरी तो विषय मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा आहे. मात्र, दुर्दैवाने रस्त्यांची स्थिती वर्षानुवर्षांपासून आहे त्याच ठिकाणी जैसे है आहे. वर्ष २०२१-२२ मध्ये शहरातील रस्त्यांसाठी हजारो कोटींची कंत्राटे काढण्यात आली. रस्ते दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी करण्यात आलेला खर्च आणि मागविण्यात आलेल्या निविदांवरून झालेला वादंग सर्वश्रुत आहे. वाद विवाद होत राहतील, मात्र वस्तुस्थिती हीच की रस्ता ज्याच्यासाठी तरतूद केली जाते तो खड्डा तसाच राहतो, पण त्यासाठी खर्च मात्र दरवर्षी वेगळा असतो आणि हेच मुंबईचे वास्तव आहे.

रस्ते सुधारण्याऐवजी सुशोभीकरणात पैसा वाया

मुंबई महापालिका सध्या मुंबईतील दुरावस्था झालेल्या जागेचे नव्यानं सुशोभीकरण करत आहे. मुंबईकर व पर्यटकांसाठी पर्यटन स्थळ उभारली जात आहे. मात्र, या सगळ्यात महत्वाची समस्या (खड्डे) ही अजून तशीच आहे. त्यामुळं रस्ते सुधारण्याऐवजी मुंबई महापालिका सुशोभीकरणात आपला पैसा वाया घालवत असल्याचं अनेक मुंबईकरांचं मत आहे.

४५ हजार ९४९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प

मुंबई महापालिका दरवर्षी अर्थसंकल्प सादर करते आणि या अर्थसंकल्पात रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी भरघोस तरतुद करते. यंदाही मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ४५ हजार ९४९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी निधीची तरतुद केली आहे. मात्र या निधीचा योग्य वापर करत पालिका मुंबईकरांना पक्के रस्ते देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, निवडणुका होणार असल्यानं मागील ५ वर्षात जितकी कामं केली नसतील, तितक्या कामांचा श्रीगणेशा, उद्घाटन, नारळ फोडणे वगैरे काम सुरू आहे. यात प्रामुख्याने रस्ते दुरूस्ती, नालेदुरूस्ती वगैरे वगैरेचा सपाटा सुरू आहे. मुंबईत सध्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळं मुंबईभर रस्ते खणले गेलेत.

२०५५ किलोमीटर लांबीचे रस्ते मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येतात. या रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिका दरवर्षी खड्डे अंदाजित ३० कोटींहुन अधिक निधी खर्च करते. इतका खर्च करूनही मुंबईतल्या रस्त्यांवरचे खड्डे आजही कायम आहेत. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा