वारली चित्रकला जगभरात पोहोचवणारे ८५ वर्षांचे 'पद्मश्री' जिव्या सोमा म्हशे यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. डहाणू तालुक्यातील गंजाड गावच्या कलमीपाडा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.१६-१७ वर्षांपूर्वी म्हशे यांना भेटण्याचा योग आला होता. हा योग माझ्या एका इंग्रजी ज्येष्ठ पत्रकारामुळे घडला. त्यावेळी म्हशे यांच्याबद्दल मला फार काही माहीत नव्हते. वारली कलेबद्दल थोडीफार माहिती होती. खरंतर गावात फिरता येईल, म्हणून मी आमच्या त्या पत्रकार मित्रासोबत गेलो. तो दिवस आजही आठवतो. मला वाटतं ६ बाय ६ च्या झोपडीत हा माणूस शांतपणे जमिनीवर पसरवलेल्या कपड्यावर रंगकाम करत होता.
आपल्याला कुणीतरी भेटायला आल्याचं त्याला काहीच वाटलं नाही. त्याच्या कलाने मग आमच्या त्या पत्रकार मित्राने प्रश्न विचारले. फक्त नावाला धोतरासारखं काहीतरी कमरेला गुंडाळलेलं. झोपडीच्या वरच्या छप्परातून त्याच्या अंगावर पाडलेलं ते ऊन आजही दिसतंय. चकचकीत टक्कल पडलेलं ते कपाळ, फक्त आणि फक्त जमिनीवरच्या कपड्यावर नजर. जणूकाही जमिनीवरच्या त्या तांबूस कापडात विलीन झालेले जिव्या सोमा. ना ब्रश ना कसले भारी रंग! लहानशा काठीचा पुढचा भाग ठेचून तयार केलेला ब्रश आणि बाजूला एका करवंटीत तांदळाने तयार केलेला पांढरा रंग.
डहाणूतल्या त्या निसर्गरम्य गावातले काही फोटोही काढले होते मी. म्हशे यांचा वारसा चालवणारे फक्त आठजण त्यावेळी त्या गावात होते. त्यातल्या एका तरुणाला नंतर जाताना आम्ही भेटलो होतो. तोसुद्धा तसाच...साधा सरळ. ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यांवरची ही कला सातासमुद्रापार पोहोचवण्यात मशे यांचा मोलाचा वाटा होता. दिसायला सोपी असलेली ही चित्र थेट निसर्गाकडे घेऊन जातात. एकमेकांच्या हातात हात गुंफलेली ती आदिवासी माणसांची पांढरी चिन्हे जणू एकतेचा संदेशच देतात! पाठीमागचा तो एकमेव तांबडा रंग सतत पायाखालच्या जमिनीची आठवण करून देतो. झोपडीत काम करणारा तो उघडाबंब जिव्या आजही स्पष्ट दिसतोय..अन् शेजारी कॅनव्हासवर काम करताना पिकासो दिसतोय!