येत्या १५ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर राडा होणार आहे. कारण येत्या १५ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर भारतीय चित्रपट क्षेत्रातल्या दोन दिग्गजांची भिडत होणार आहे. सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका असलेला '२.०' आणि कमल हसनची मुख्य भूमिका असलेला 'विश्वरूपम २' हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.
'विश्वरूपम २' हा चित्रपट खरंतर २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित होणार होता. मात्र, पोस्ट प्रोडक्शनचं काम लांबल्यामुळे प्रदर्शनाची तारीख एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. आता मात्र हा चित्रपट १५ ऑगस्टलाच प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळत आहे. ट्रेंड अॅनालिस्ट आणि इंडस्ट्री ट्रेकर रमेश बाला यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. असं झालं, तर १५ ऑगस्टला मोठ्या पडद्यावर 'राडा' होणार हे नक्की!
जी परिस्थिती 'विश्वरूपम २'ची, तीच रजनीकांतच्या '२.०'चीही झाली आहे. हा चित्रपटही या वर्षी २६ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. पण चित्रपटात असलेल्या स्पेशल इफेक्ट्सवर काम बाकी असल्यामुळे प्रदर्शनाची तारीख २७ एप्रिल करण्यात आली. तेव्हाही तामिळनाडूमध्ये टेक्निशियन युनियनने संप पुकारल्यामुळे पुन्हा तारीख बदलण्यात आली. आता मात्र प्रदर्शनाची तारीख १५ ऑगस्टच्याच आसपास असण्याची दाट शक्यता चित्रपटाच्या टीमकडून वर्तवली जात आहे.
सध्या हे दोन्ही चित्रपट पोस्ट प्रोडक्शन प्रोसेसमध्ये आहेत. या चित्रपटांचे ट्रेलर प्रदर्शित होतील, तेव्हाच चित्रपट प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात येईल. '२.०'मध्ये रजनीकांतसोबतच अभिनेता अक्षय कुमारही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
रजनीकांतचा 'काला' हा चित्रपट येत्या ७ जूनला प्रदर्शित होत असून २८ मेला या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता. या चित्रपटात रजनीकांतसोबत नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत आहेत.
हेही वाचा