देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या वाढत्या प्रकरणामुळे बॉलिवूडमध्येही भीती पसरली आहे. त्यामुळे चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात येत आहे.
शाहिद कपूरच्या जर्सी या चित्रपटाचं प्रदर्शन रद्द करण्यात आलं आहे. आधी ३१ डिसेंबरला रिलीज होणार होता, पण निर्मात्यांनी शेवटच्या क्षणी निर्णय घेत तो सिनेमा पुढे ढकलला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अक्षय कुमारच्या पृथ्वीराज या चित्रपटाचा ट्रेलरही पुढे ढकलण्यात आला आहे.
आता पुढच्या एका महिन्यात म्हणजेच नवीन वर्षात ४ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ७ जानेवारीला RRR, १४ जानेवारीला राधे श्याम, २४ जानेवारीला पृथ्वीराज आणि २८ जानेवारीला अटॅक रिलीज होणार होते. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चित्रपटांच्या तारखा बदलल्या जात आहेत.
'83' चित्रपटाचे कलेक्शन देखील अपेक्षेपेक्षा फारच कमी झाल्याची माहिती निर्मात्यांनी दिली. ओमिक्रॉनच्या भीतीमुळे कलेक्शन कमी झाल्याचा दावा निर्मात्यांनी केली आहे. अनेक राज्ये नाईट कर्फ्यू सारखे निर्बंध लादत आहेत, ज्याचा थेट परिणाम बॉक्स ऑफिसवर होत आहे. ते सर्वांच्या नियंत्रणाबाहेर आहे.
'पृथ्वीराज'चा ट्रेलर २७ डिसेंबरला रिलीज होणार होता. मात्र, निर्मात्यांनी शेवटच्या क्षणी ही योजना रद्द केली. यामागे देशातील वाढती कोरोना प्रकरणे असल्याचे मानले जात आहे.
यशराज फिल्म्स निर्मित, 'पृथ्वीराज' २१ जानेवारी २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे, ज्याची घोषणा अक्षयनं जवळजवळ ३ महिन्यांपूर्वी केली होती. सूत्रांवर विश्वास ठेवला तर निर्माते आता चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अनिश्चित आहेत.
रिपोर्ट्सनुसार, पृथ्वीराज मोठ्या कष्टानं रिलीजसाठी तयार आहे, त्यामुळे निर्माते कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ इच्छित नाहीत. यामागे अर्थसंकल्प हेही एक कारण आहे. या चित्रपटावर सुमारे 300 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
दरम्यान, अनेक राज्यांमध्ये कडक कोरोना निर्बंध लावण्यास सुरुवात झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील सर्व सिनेमागृहे तत्काळ बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामागील कारण म्हणजे दिल्लीतील वाढती कोरोना प्रकरणे. सध्या दिल्लीत ५६ सिनेमा हॉल आहेत. त्यापैकी १७ मल्टिप्लेक्स आहेत. स्क्रीनची एकूण संख्या ९९ आहे.