मुंबईत अवकाळी पावसानं डिसेंबरचे पहिले दोन दिवस चांगलीच बॅटिंग केली. यामुळे मुंबईचा वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) सुधारला आहे. सध्याच्या निर्देशांकानुसार वायु गुणवत्तानं "समाधानकारक" पातळी गाठली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी मुंबईनं खराब AQI नोंदवला होता. विशेषत: बीकेसी, कुलाबा आणि माझगावमधील वायु गुणवत्ता अधिक खराब होती.
एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) द्वारे किमान पुढील दोन दिवसांसाठी "समाधानकारक" AQI चा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गुरुवारी, २ डिसेंबर रोजी, शहराचा एकूण AQI ७८ वर होता. याचा अर्थ ते हवेतील PM २.५ (पार्टिक्युलेट मॅटर) पातळीवर समाधानकारक होते. तथापि, मालाड आणि कुलाबा सारख्या भागात "मध्यम" AQI नोंदवला गेला.
SAFAR चे प्रोग्राम डायरेक्टर गुफ्रान बेग म्हणाले की, मुंबईत AQI ची मध्यम ते समाधानकारक श्रेणी नोंदवली गेली आहे. असं होणं हे दुर्मिळ आहे. हे समुद्राच्या वाऱ्याच्या उलट्या प्रवाहामुळे होऊ शकतं, असंही ते म्हणाले.
हिवाळ्यात आर्द्रता, कमी समुद्राची वारे, तापमानात घट आणि उच्च प्रदूषण यामुळे हवेची गुणवत्ता मुख्यतः खराब असते. दुसरीकडे, AQI नुसार, द्वीपकल्पीय भारतातील २४ प्रमुख शहरांमध्ये मुंबईमध्ये PM १० (पार्टिक्युलेट मॅटर)चे प्रमाण सर्वाधिक आहे.
दरम्यान, डिसेंबरच्या पहिल्या दोन दिवशी मुंबईकरांना अवकाळी पावसानं झोडपून काढलं. यामुळे, भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) सांताक्रूझ वेधशाळेनं गुरूवार, २ डिसेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता गेल्या २४ तासांत ९१ मिमी पावसाची नोंद केली आहे. हा डिसेंबरमध्ये शहरातील आतापर्यंतचा सर्वाधिक एक दिवसाचा पाऊस आहे.
हेही वाचा