Advertisement

आता मेट्रोच्या बॅरिगेट्सवरुन वाद; याचिका दाखल


आता मेट्रोच्या बॅरिगेट्सवरुन वाद; याचिका दाखल
SHARES

कुलाबा-वांद्र-सिप्झ मेट्रो-3 ला लागलेले वादाचे ग्रहण सुटता सुटत नाही. झाडांची कत्त्ल, आरे कारशेड, ध्वनिप्रदूषण असे वाद झाल्यानंतर आता मेट्रो-3 च्या कामासाठी लावण्यात आलेल्या बॅरिगेट्सचा वाद उच्च न्यायालयात गेला आहे. कुलाबा येथे राहणाऱ्या अॅड. रॉबिन जयसिंघानी यांनी ध्वनिप्रदूषणानंतर आता बॅरिगेट्समुळे आसपासच्या रहिवाशांचे जीवन धोक्यात आल्याची तक्रार केली आहे. यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) विरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी 13 सप्टेंबरला होणार आहे.


पहिला वाद कारशेडचा...

'मुंबईकरांच्या उज्ज्वल भविष्याकरता' अशी हाक देत एमएमआरसीने मेट्रो-3 च्या कामाला सध्या वेग दिला आहे. शक्य तितक्या लवकर हा प्रकल्प पूर्ण करत मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचा एमएमआरसीचा मानस आहे. मात्र सर्वात आधी आरे कारशेडविरोधात राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल झाली आणि कारशेडच्या कामाला ब्रेक लागला. या याचिकेची सुनावणी अद्याप सुरू असून लवादाने आरेमध्ये कोणतेही काम करण्यास स्थगिती दिली आहे.


झाडांच्या कत्तलीचं बिघडलेलं गणित...

कारशेडनंतर झाडांच्या कत्तलीविरोधात पर्यावरणप्रेमी रहिवाशी न्यायालयात गेले नि पुन्हा मेट्रो-3 च्या कामाचा वेग मंदावला. दरम्यान, या याचिकेचा निर्णय एमएमआरसीच्या बाजूने लागल्याने एमएमआरसीने सुटकेचा नि:श्वास सोडला. 


ध्वनिप्रदूषणामुळे पुन्हा खोडा...

पण त्यानंतर आता पुन्हा ध्वनीप्रदूषणामुळे आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मनस्ताप होत असल्याचे म्हणत जयसिंघानी यांनी एमएमआरसीविरोधात न्यायालयात धाव घेतली. महत्त्वाचे म्हणजे या मनस्तापाच्या मोबदल्यात फेब्रुवारी 2017 अर्थात काम सुरू झाल्यापासून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रत्येक दिवसाप्रमाणे 10 हजार रुपये कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मिळावेत असा दावाही त्यांनी ठोकला आहे.


मेट्रोची रात्रपाळी बंद!

दरम्यान या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने मेट्रो-3 ची रात्रपाळी बंद केली आहे. रात्रीच्या वेळेस मेट्रोचे काम बंद झाल्याने त्याचा परिणाम मेट्रो-3च्या कामावर होत असून त्यामुळे मेट्रो-3चे मोठे नुकसानही होत असल्याची माहिती खुद्द एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना कबुल केले आहे. असे असताना आता जयसिंघानिया यांनी बॅरिगेट्समुळे कुलाब्यातील रहिवाशांचे जीवन धोक्यात आल्याचा दावा करत न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

कुलाबा परिसरात अनेक निवासी आणि व्यावसायिक इमारती आहेत. या इमारती 20 ते 30 मजली असून इमारतींना आग लागली तर अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यासाठी थोडीही जागा शिल्लक नाही. त्यामुळे रहिवाशांनी आगीत मरायचे का? असा सवाल जयसिंघानी यांनी केला आहे. तर अॅम्ब्युलन्स येण्यासाठीही जागा नसल्याने रूग्णांना कसे रूग्णालयात न्यायचे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

मेट्रो-3 चे काम पुढील किमान पाच वर्षे सुरू राहणार असून किमान वर्षभर तरी हे बॅरिगेट्स राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रहिवाशांनी यापुढे भितीत आणि चिंतेत आयुष्य काढायचे का? असा सवालही जयसिंघानी यांनी केला आहे. मुख्य म्हणजे भुयारी मार्गाचे काम वेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करुन करता येत असताना एमएमआरसीने याकडे काणाडोळा केला आहे. सध्या वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानामुळेच अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या असल्याने आपण न्यायालयात गेल्याचे जयसिंघानी यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना स्पष्ट केले आहे.


एमएमआरसी ठाम...

दरम्यान, एमएमआरसीने मात्र बॅरिगेट्स योग्य प्रकारेच लावण्यात आले असून अग्निशमन दलाची गाडी वा रुग्णवाहिका इमारतीतीच्या परिसरात जाण्यास कोणाताही अडसर येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. मेट्रो-3च्या बॅरिगेट्समुळे कुलाब्यापासून सिप्झपर्यंतच्या अनेक रस्त्यांवरील दुकाने झाकली गेली आहेत. त्यामुळे दुकानदारांच्या धंद्याचे वांदे झाले आहेत. दुकानदारांनी याबाबत नाराजी व्यक्त करत एमएमआरसीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.



हेही वाचा

'मेट्रोच्या कामांमुळेच मुंबई तुंबली' आदित्यचा 'एमएमआरसी'वर निशाणा


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा