Advertisement

सुरेश बनसोडे पुन्हा महापालिकेच्या मुख्य लेखापरिक्षकपदी


सुरेश बनसोडे पुन्हा महापालिकेच्या मुख्य लेखापरिक्षकपदी
SHARES

मुंबई महापालिकेचे मुख्य लेखापरिक्षक सुरेश बनसोडे यांना महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी राज्य सरकारकडे पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून बनसोडे हे पुन्हा महापालिकेत आपल्या जागेवर विराजमान झाले. न्यायालयाने बनसोडे यांना महापालिकेत पुन्हा रुजू करून घेण्याचे आदेश दिल्यानंतरही प्रशासनाकडून त्यांना पुन्हा या पदावर सामावून घेण्यासाठी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली होती. परंतु, अखेर शुक्रवारी प्रशासनाने ऑर्डर दिल्यानंतर बनसोडे यांनी पुन्हा पदभार स्वीकारत महापालिका आयुक्तांसह भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली.


गोपनियतेचा भंग केल्याचा ठपका

महापालिकेतील मुख्य लेखापरीक्षक सुरेश बनसोडेंच्या सांगण्यानुसारच, कुलाबा सांडपाणी प्रकल्पाच्या कंत्राटाची कागदपत्रे बाहेरच्या व्यक्तींना दाखवण्यात आली असून या व्यक्तींनी ही कागदपत्रे मोबाईलमध्ये टिपून चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केला होता.  कोटक यांच्या तक्रारीनंतर कंत्राटदाराला गोपनीय कागदपत्रे पुरवण्याचा आरोप ठेवत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बनसोडेंची उचलबांगडी करत त्यांना राज्य सरकारकडे परत पाठवले होते.


बदली आदेशाला स्थगिती

आयुक्तांनी हकालपट्टी केल्यानंतर बनसोडे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी बनसोडे यांच्या वकिलांनी बदलीचा अधिकार आयुक्तांना नाही, तर फक्त राज्य शासनालाच आहे, असा दावा केला. त्यानुसार न्यायालयाने बदलीच्या आदेशाला स्थगिती दिली होती.


पुन्हा सेवेत घेण्यास चालढकल

25 जुलैला न्यायालयाने स्थगिती देऊनही बनसोडेंना महापालिका सेवेत रुजू करून घेण्यास प्रशासनाकडून दिरंगाई होत होती. त्यामुळे बनसोडेंनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले जात असल्यामुळे न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याची तयारी केली होती. परंतु त्यापूर्वी शुक्रवारी त्यांना प्रशासनाच्या वतीने ऑर्डर देण्यात आली आणि त्यांनी शुक्रवारपासूनच आपला पदभार स्वीकारला. त्यामुळे एकप्रकारे बनसोडे यांची ऑर्डर काढणाऱ्या आयुक्तांवर त्यांना परत सेवेत रुजू करून घेण्याची नामुष्की ओढवली आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा