Advertisement

प्लास्टिकबंदी इफेक्ट! महापालिकेकडे १२० टन प्लास्टिक जमा

राज्यात प्लास्टिक बंदी जाहीर करण्यात आली असून २३ जूनपर्यंत आपल्या जवळील सर्व प्लास्टिकच्या वस्तूंची विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. या कालावधीनंतर प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर महापालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यासह वस्तूंचा वापर करणारे आणि पिशव्या उपलब्ध करून देणारे या सर्वांवर कारवाईची टांगती तलवार असणार आहे.

प्लास्टिकबंदी इफेक्ट! महापालिकेकडे १२० टन प्लास्टिक जमा
SHARES

राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची घोषणा केल्यानंतर मुंबईतील प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार महापालिकेने काही महत्वाच्या ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्र सुरु केली असून हेल्पलाइनच्या माध्यमातून प्लास्टिक गोळा करण्याचं काम सुरु आहे. त्यानुसार आतापर्यंत महापालिकेकडे १२० टन प्लास्टिक जमा झालं आहे.


२३ जूनची मुदत

राज्यात प्लास्टिक बंदी जाहीर करण्यात आली असून २३ जूनपर्यंत आपल्या जवळील सर्व प्लास्टिकच्या वस्तूंची विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. या कालावधीनंतर प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर महापालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यासह वस्तूंचा वापर करणारे आणि पिशव्या उपलब्ध करून देणारे या सर्वांवर कारवाईची टांगती तलवार असणार आहे.


महापालिकेची विशेष व्यवस्था

त्यामुळे दिलेल्या मुदतीपूर्वी नागरिकांना आपल्या जवळील प्लास्टिक पिशव्यांसह बाटल्या आणि वस्तूंची विल्हेवाट लावता यावी यासाठी महापलिकेच्यावतीने विशेष डब्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्लास्टिक संकलन केंद्रांमध्ये नागरिकांकडून प्लास्टिक जमा केले जात आहे.


कुठून सर्वाधिक प्लास्टिक जमा?

आतापर्यंत २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील प्लास्टिक संकलन केंद्रांमध्ये सुमारे १२ टन तर हेल्पलाईनवर संपर्क साधून महापालिकेच्या विशेष वाहनांतून सुका कचरा केंद्रावर १०८ टन प्लास्टिक जमा करण्यात आलं आहे. यामध्ये सर्वांधिक प्लास्टिक विलेपार्ले अंधेरी-जोगेश्वरी पूर्व (के-पूर्व) ४५ टन प्लास्टिक जमा झाले आहे.

त्याखालोखाल भायखळा ई विभागात ३४ टन तर वांद्रे ते सांताक्रूझ पश्चिम(एच-पश्चिम) या भागातून सुमारे ३० टन प्लास्टिक जमा झालं आहे. तर अंधेरी जोगेश्वरी पश्चिम (के-पश्चिम) १६ टन एवढं प्लास्टिक जमा झालं आहे. मात्र, अन्य विभागांमध्ये प्लास्टिक विल्हेवाटीला कमी प्रतिसाद मिळत आहे. मालाड, भांडुप, लोअर परळ आदी भागांमधून सर्वांत कमी प्लास्टिक जमा झालं आहे.


हेल्पलाइनला अल्प प्रतिसाद

प्लास्टिक बंदी आणि सुका कचरा वर्गीकरण केंद्र आदी ठिकाणांची माहिती देण्यासाठी महापालिकेने १८००२२२३५७ या क्रमांकाची हेल्पलाइन सुरु केली आहे. त्यामुळे ज्या सोसायटींना तसेच नागगिरकांना आपल्या जवळील प्लास्टिकची विल्हेवाट लावायची असल्यास त्यांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असं आवाहन सहायक आयुक्त तसेच प्लास्टिक बंदी जनजागृती कार्यक्रमाचे समन्वयक किरण दिघावकर यांनी केलं आहे.

मात्र १९ दिवस उलटूनही हेल्पलाइनवर केवळ १५३ लोकांनीच संपर्क साधला असू गोरेगाव, मालाड भागातून १० एप्रिल आणि भांडुप-कांजूर भागातून २८ एप्रिलनंतरही कोणीही हेल्पलाइनवर संपर्क साधलेला नाही.


कुठे आहे प्लास्टिक संकलन केंद्र?

गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे महापालिका मंडई (दादर फूल मार्केट), कुलाबा कॉजवे, मंगलदास मार्केट, महात्मा जोतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट), चेंबूर मंडई, फॅशन स्ट्रीट, चोर बाजार, हिंदमाता मंडई, जव्हेरी बाजार, साईनाथ मंडई मालाड, घाटकोपर मंडई, मुलुंड मंडई, लोखंडवाला मंडई इत्यादी २५ ठिकाणी प्लास्टिक संकलने केंद्रे सुरु करण्यात आली आहे.



हेही वाचा-

पालिकेच्या 'या' टोल फ्री क्रमांकावर मिळवा प्लास्टिक विल्हेवाटीची माहिती

मुंबई विद्यापीठातही आता 'प्लास्टिकबंदी’!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा