मुंबईतील वांद्रे पश्चिमेकडील लिंकिंग रोडवरील क्रोमा मॉलला भीषण आग लागली आहे. आज 29 एप्रिलला पहाटे ही आग लागली. यामध्ये क्रोमा शोरूम जळून खाक झालं आहे. दरम्यान या प्रकरणात अजित पवार गटाचे नेते झिशान सिद्दीकी यांनी निष्काळजीपणाचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.
अग्निशमन दल पहाटे चार वाजता घटनास्थळी दाखल झालं. मात्र ते मजा-मस्ती करीत होते. आग एका ठिकाणी लागली होती आणि ते पाणी दुसऱ्या ठिकाणी मारत होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करायला हवी अशी मागणी झिशान सिद्दीकी यांनी केली आहे. वांद्रे पश्चिमेकडील लिंक रोडवरील आग लागलेला लिंक स्क्वेअर मॉल हा झिशान सिद्दीकी यांच्या मालकीचा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 15 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्यापही मॉलमधून काळा धूर येत असून आग पसरत असल्याचं सांगितलं जात आहे. तिसरा मजला जळून खाक झाला असून ही आग दुसऱ्या मजल्यावर पसरण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
पहाटे चार वाजल्यापासून आम्ही इथं आहोत. अग्निशमन दलाच्या निष्काळजीपणामुळे आग पसरली आहे. क्रोमाच्या शोरूममध्ये झालेल्या स्पार्कमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. त्यानंतर आम्ही पहाटेच अधिक पाणी मागविण्याची मागणी केली. मात्र यांच्याजवळ यंत्रणा नव्हती. आणि जेव्हा आग विझवण्याची यंत्रणा आली तेव्हा त्याचा वापर कसा करायचा हेच त्यांना कळत नव्हतं. त्यामुळे हे अत्यंत दुर्देवी आहे, असा आरोप जिशान सिद्दीकी यांनी केला आहे.
हेही वाचा
एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील रहिवाशांना त्याच ठिकाणी घरं मिळणार