पर्यटकांच्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू असलेल्या महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळील धोबीघाट परिसराला अनधिकृत बांधकामांनी विळखा घातला होता. अतिक्रमणांच्या जळमटांमुळे या पुरातन वास्तूला बकाल स्वरूप प्राप्त झालं होतं. हे लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने या अतिक्रमणांवर कारवाई करत धोबी घाट परिसराला शुक्रवारी अतिक्रमणमुक्त केलं.
संत गाडगे महाराज चौक म्हणजेच सात रस्त्याजवळील धोबीघाट परिसरात दररोज हजारो कपडे धुतले जातात. यासाठी धोबी घाट परिसरात पाण्याचे हौद, कपडे धुण्यासाठी ओटे आणि पाणी वाहून जाण्याच्या सुविधा आहेत. याच परिसरातील पायवाटा आणि काही हौदांवर अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. तर ५ ठिकाणी अनधिकृत शेड उभारण्यात आले होते. या अतिक्रमणांमुळे धोबीघाटमध्ये प्रवेश घेण्यास अडथळे येत होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन मुंबई पोलिसांच्या सहकार्याने ही सर्व अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली.
या अनधिकृत बांधकामांमुळे या धोबीघाट परिसरात कपड्यांचे गाठोडे घेऊन येणाऱ्या - जाणाऱ्यांना चालण्यास अडथळे येत होते. याबाबत महापालिकेच्या 'जी दक्षिण' विभागाला तक्रारी प्राप्त झाल्यावर मुंबई पोलिसांच्या सहकार्याने धडक कारवाई करून येथील पायवाटा मोकळ्या करण्यात आल्या. तसंच ५ ठिकाणी उभारण्यात आलेले अनधिकृत शेड देखील तोडण्यात आल्याची माहिती 'जी दक्षिण' विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांनी दिली.
धोबीघाट परिसरातील अंतर्गत पायवाटा चिंचोळ्या असल्याने तिथं जेसीबी, पोकलेन यासारखी यंत्रसामुग्री नेणं शक्य नव्हतं. त्यामुळे या परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करताना हॅण्ड कटर, कुदळ, फावडे, हातोडा अशी पांरपारिक साधने वापरण्यात आली. या कारवाईसाठी मुंबई महापालिकेचे ४६ कामगार-कर्मचारी-अधिकारी घटनास्थळी कार्यरत होते.
हेही वाचा-
दहिसर, पोयसर, वालभट, ओशिवरा नद्यांमध्ये लवकरच नौकाविहार!
पालिकेचा अजब न्याय! कंत्राटदाराला दिला ४५ लाखांचा बोनस!