बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) पशुवैद्यकीय विभागाने कुत्रे आणि मांजरांच्या तक्रारींसाठी मोबाईल ॲप तयार केले आहे. कुत्रा चावला, परिसरात वाढलेली कुत्र्यांची संख्या, भटक्या कुत्र्या-मांजरांचा उपद्रव, कुत्रे-मांजरांचे लसीकरण, त्यांची नसबंदी अशा कोणत्याही तक्रारी आणि विनंती या ॲपवर करता येतील.
पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे (व्हीएचडी) ॲप स्वयंचलित असून संबंधित विभागाकडे तक्रारी पाठवण्याची प्रक्रिया ॲपद्वारे केली जाणार आहे.
बऱ्याच परिसरात भटक्या कुत्र्यांची किंवा मांजरींची संख्या वाढली आहे. कधी कुत्र्याला रेबीज झाल्याचा संशय परिसरातील रहिवाशांना येतो, तर कधी कुणाचा पाळीव कुत्रा खूप भुंकतो. प्राण्यांबाबत अशा अनेक तक्रारी आहेत.
आतापर्यंत नागरिक विभाग कार्यालयात जाऊन किंवा ईमेलद्वारे यासंदर्भात तक्रारी करू शकत होते. मात्र त्या तक्रारींचे काय झाले याची माहिती कोणालाच मिळत नव्हती. परंतु, आता महापालिकेने ॲप तयार केले असून त्यावर तक्रारींचा पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती पशुवैद्यकीय आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ॲप लाँच झाल्यापासून सुमारे 40 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित विभाग किंवा संबंधित सामाजिक संस्थेपर्यंत तक्रार पोहोचवण्याचे काम या ॲपद्वारे केले जाते.
पकडलेल्या आणि सोडलेल्या प्राण्यांचे अचूक स्थान रेकॉर्ड करण्यासाठी ॲप GPS आणि जिओफेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करते. तसेच जनावरांची आरोग्य तपासणी, नसबंदी आणि लसीकरणाच्या वेळापत्रकाची नोंद ठेवते. माय बीएमसी मोबाइल ॲप आणि एमसीजीएम पोर्टलवरून या ॲपवर प्रवेश केला जाऊ शकतो. यासंदर्भात बीएमसीच्या वेबसाइटवर जाऊनही तक्रार करता येईल.
नागरिकांना तक्रारी करणे सोपे जावे आणि या तक्रारींवर वेळीच कारवाई करता यावी, यासाठी पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने ॲप तयार केले आहे. त्याचे नाव पशुवैद्यकीय आरोग्य विभाग (VHD) ऍप्लिकेशन आहे आणि ते महापालिकेच्या वेबसाइटवरून ऍक्सेस केले जाऊ शकते.
हेही वाचा