पावसाळ्यात मुंबईतील खड्डयांच्या समस्येमुळे जनतेला होणारा त्रास लक्षात घेता महापालिकेने मुंबईकरांसाठी २४ विभाग कार्यालयांतील व्हॉट्सअप नंबर उपलब्ध करून दिले आहेतच. सोबतच या व्हॉट्सअप नंबरच्या जोडीला महापालिकेने तक्रारी नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे. जे मुंबईकर व्हाॅट्सअॅप वापरत नाहीत, अशा मुंबईकरांनी महापालिकेच्या या १८००२२१२९३(1800221293) यंदा टोल फ्री क्रमांकावर खड्यांची तक्रार नोंदवावी, असं आवाहन रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी केलं आहे.
मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात आणि या खड्डयांमुळे महापालिकेला टिकेचं धनी व्हावं लागतं. त्यामुळे यंदा महापालिकेने खड्डयांची समस्या निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे. महापालिकेने प्राधान्याने ३ टप्प्यांमध्ये रस्ते विकासाचं काम हाती घेतलं आहे. परिणामी खड्ड्यांचं प्रमाण कमी झालं आहे. मात्र हमी कालावधीतील रस्त्यांवर खड्डे पडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने महापालिका अलर्ट आहे.
स्मार्टफोनवरून महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डयांची तक्रार मुंबईकरांना नोंदवता यावी म्हणून महापालिकेने MCGM हे मोबाइल अॅपही उपलब्ध करून दिलं आहे. हे अॅप प्लेस्टोअरमधून डाऊनलोड करता येईल. या मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांचे फोटो नागरीक अपलोड करू शकतात. तसंच त्यांनी केलेल्या तक्रारीसंदर्भात काय कार्यवाही झाली, त्याची माहितीही नागरिक करून घेऊ शकतात.
हेही वाचा-
व्हाॅटस-अॅपद्वारे करा मुंबईतील खड्ड्यांची तक्रार
मुंबईतील रस्त्यांवरील खड्डयांची भूक होतेय कमी