महापालिका लवकरच भटक्या कुत्र्यांप्रमाणे भटक्या मांजरांचीही नसबंदी करणार आहे. शहरात मांजरांच्या वाढलेल्या संख्येला आळा घालण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. याकरीता महापालिकेने जून २०१८ मध्ये भारतीय पशु कल्याण मंडळा (AWBI)कडे मांजरांचा समावेश एबीसी (अॅनिमल बर्थ कंट्रोल)त करण्याची परवानगी मागितली होती. कंत्राटदाराच्या माध्यमातून हा नसबंदी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
पशु कल्याण मंडळाने नसबंदीसाठी मंजुरी दिल्यानंतर महापालिकेने ही मोहीम राबवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या कामासाठी कंत्राटदार संस्थेची नियुक्ती झाल्यानंतर १ एप्रिलपासून मांजरांच्या नसबंदीला सुरूवात करण्यात येईल.
सद्यस्थितीत काही खाजगी क्लिनिक आणि एनजीओ शहरातील भटक्या मांजरांची नसबंदी करतात. त्यामुळे शहरात मांजरांची नेमकी किती संख्या आहे, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. महापालिकेने या योजनेसाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नसबंदी उपक्रमा अंतर्गत महापालिका मांजरासाठी ६०० आणि मांजरींसाठी ८०० रुपये खर्च करणार आहे. 'एबीसी'नुसार नसबंदीसाठी नियम बनवण्यात येणार आहेत.