देशातल्या सर्वांत व्यग्र शहरांपैकी एक असलेल्या मुंबईत दररोज पायी चालत, बाईकवरून प्रवास करत, डबेवाले लाखो लोकांना जेवण पोहोचवतात. अथक परिश्रम करणाऱ्या डबेवाल्यांना दोन घटका विश्रांती मिळावी या उद्देशाने मुंबईत ‘डबेवाला भवन’ उभारण्यात येणार आहे. डबेवाल्यांना हक्काचं ठिकाण मिळावं, त्यांच्या कुटुंबांना विविध सुविधा उपलब्ध करुन देता याव्यात यासाठी मुंबईत ‘डबेवाला भवन’ उभारण्याचा ठराव महापालिका सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
मुंबईत पर्यटनासाठी येणारे अनेक पर्यटक मुंबईच्या डबेवाल्यांची आवर्जून भेट घेतात. अनेकदा आपला वेळ त्यांच्यासोबत घालवतात. तसंच परदेशातली शिष्टमंडळे देखील डबेवाल्यांची भेट घेतात. ही बाब लक्षात घेत मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी ‘डबेवाला भवन’ उभारण्यात यावं, अशी मागणी करणारी ठरावाची सूचना शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी महापालिका सभागृहात मांडली होती.
हा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आला असून आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजूरी दिल्यानंतर ‘डबेवाला भवना’च्या उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे.
हेही वाचा -
मतदानासाठी यंदा प्रथमच 'व्हीव्हीपॅट'चा वापर
बेस्टच्या भंगारातील बसगाड्यांमध्ये उभारणार शौचालय