Advertisement

म्हाडातलं बदल्यांचं राजकारण चव्हाट्यावर


म्हाडातलं बदल्यांचं राजकारण चव्हाट्यावर
SHARES

घोटाळे, गोंधळ आणि भ्रष्टाचारामुळे म्हाडा नेहमीच चर्चेत असते. यात आणखी एका चर्चेची भर पडली आहे. ती म्हणजे म्हाडातील बदल्यांमधील भ्रष्टाचाराची. म्हाडातील बदल्यामंध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप दबक्या आवाजात वर्षानुवर्षे म्हाडात होतच आहे. पण आता हा आवाज मोठा झाला असून तो थेट म्हाडा उपाध्यक्षांपर्यंत पोहोचला आहे.


पत्र 'मुंबई लाइव्ह'च्या हाती

बदल्यांमध्ये अनियमितता आणि गैरव्यवहार असल्याचे म्हणत कर्मचारी संघटनांनीच बदल्यांविरोधात म्हाडा उपाध्यक्षांना पत्र लिहिले आहे. या पत्रात कर्मचाऱ्यांमधील असंतोष मांडत बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी संघटनांनी केली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण कर्मचारी संघटना आणि म्हाडा मागासवर्गीय कर्मचारी संघटनांनी याबाबत उपाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रांची प्रत 'मुंबई लाइव्ह'च्या हाती लागली आहे. या पत्रावरुन म्हाडातील बदल्यांमधील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे.


निनावी पत्राने खळबळ

एप्रिलमध्ये म्हाडातील एका निनावी पत्राने चांगलीच खळबळ उडवली होती. या पत्रानुसार तत्कालीन म्हाडा उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी निवृत्तीआधी काही दिवस पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यासाठी 5 कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.

मात्र हे पत्र निनावी असल्याने त्यात काहीही तथ्य नसल्याचे म्हणत म्हाडाकडून हे प्रकरण दाबवण्यात आले. असे असले तरी पत्रामुळे खऱ्या अर्थाने म्हाडातील बदल्यांमधील गैरव्यवहार आणि त्यातून कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या असंतोषाला वाचा फुटली. कर्मचारी संघटनांनी पुढे येत यासंबंधीचे पत्र पाठवत बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे.


मलाईदार विभागात बदली हवी

निवासी अभियंता, झोपु मंडळ आणि एसआरए (प्रतिनियुक्ती) या तीन मलईदार ठिकाणी बदली मिळावी यासाठी कर्मचारी-अधिकाऱ्यांचा प्रयत्न असतो. तर याच तीन विभागात सलग बदली करुन घेण्याकडेही कल असतो. कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या मनाप्रमाणे बदली देण्यात येते आणि त्यासाठी भरमसाठ पैसे मोजले जात असल्याचा आरोप होतो आहे.

या धर्तीवर संघटनांनी पाठवलेलं पत्र हे अत्यंत महत्त्वाचं ठरत आहे. कारण, याआधी कधीही संघटनांनी पुढे येत बदल्यांविरोधात आवाज उठवला नव्हता. पण आता गेल्या वर्षभरात बदल्यांमधील गैरव्यवहार प्रचंड प्रमाणात वाढला असून त्यामुळे सर्वसामान्य कर्मचारी-अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे म्हटले आहे.


प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

संघटनांच्या या पत्रावर आता उपाध्यक्ष आणि प्रशासन काय भूमिका घेतात हेच पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, म्हाडा प्रशासनाला हे पत्र मिळाले आहे का ? या पत्राविषयी काय कारवाई करणार? याबाबत म्हाडाचे सचिव भारत बास्टेवाड यांच्याशी 'मुंबई लाइव्ह'ने संपर्क साधला, मात्र त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

तर म्हाडातील बदल्यामंधील गैरव्यवहारासंबंधीच्या तक्रारींची दखल घेत गृहनिर्माण विभागाने वर्षभरातील बदल्यांचा तपशील मागवत चौकशी सुरू केल्याची चर्चा आहे. गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव संजय कुमार यांनी मात्र हे वृत्त नाकारले आहे. म्हाडातील बदल्यांविषयी कोणतीही चौकशी सुरू नाही वा बदल्यांचा कोणताही तपशील मागवण्यात आला नसल्याची माहिती संजय कुमार यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

असे असले तरी आता म्हाडा प्राधिकरण संघटनांच्या पत्राला काय उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


बदली प्रक्रिया आॅनलाईन करा

बदलीमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी म्हाडा कर्मचारी संघटनांनी केली आहे. त्यासाठी साॅफ्टवेअर तयार करत बदली प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबवण्याचीही सूचना केली आहे.



संघटनांच्या सूचना...

  • दरवर्षी बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी जानेवारीत तयार करावी
  • ही यादी फेब्रुवारीत प्रसिद्ध व्हावी
  • बदलीपात्र कर्मचाऱ्यांकडून 3 पर्याय मागवावेत
  • मंडळे-प्राधिकरणांकडील योजना, मनुष्यबळाचा विचार करुन बदल्या
  • अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी बदल्या, पदोन्नतीवर नियुक्तीचे एकच धोरण असावे
  • निवासी कार्यकारी अभियंता, झोपु मंडळ, एसआरए विभागात सलग नियुक्ती नको
  • सचिव-प्राधिकरण कार्यालयातील बदली-पदोन्नतीचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली 3 वर्षे पूर्ण झाल्यावर त्वरीत व्हावी
  • विभागीय मंडळातील कर्मचाऱ्यांची बदली त्याच मंडळांतर्गत विविध विभागात व्हावी
  • आवश्यक असेल तरच इतर मंडळात बदली  



हे देखील वाचा -

म्हाडात पैसे घेऊन अभियंत्यांची बदली? गृहनिर्माण विभागाकडून चौकशी


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा