मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून झाडे पडून नागरिकांचे बळी जात आहेत. झाडांच्या फांद्यांची छाटणी करूनही झाडे पडत असल्याने आता अशाप्रकारच्या धोकादायक झाडांचा शोध घेण्यासाठी 'ट्री रडार' या अत्याधुनिक यंत्राचा वापर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुंबईतील धोकादायक झाडे तोडून होणारी संभाव्य जीवित आणि वित्तहानी जर टाळायची असेल तर महापालिकेने 'ट्री रडार' या अत्याधुनिक यंत्राचा वापर करायला हवा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका समृद्धी काते यांनीं ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे.
जागतिक तापमानात वाढ होऊन वातावरणात बदल होत आहे. यामुळे पावसाळ्यासह इतर मोसमातही वेळीअवेळी वादळीवाऱ्यासह मुसळधार पावस पडल्याने झाडे पडून पादचारी जखमी तसेच मृत पावत आहेत. अशा घटना भविष्यातही घडण्याची दाट शक्यता असल्याने याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे धोकादायक झाडांचा शोध घेण्यासाठी ज्याप्रमाणे परदेशात 'ट्री रडार'चा वापर करण्यात येतो, त्याच प्रमाणे या अत्याधुनिक 'ट्री रडार' चा वापर करणे ही काळाची गरज असल्याचे शिवसेना नगरसेविका समृद्धी काते यांनी म्हटले आहे.