महापालिकेच्या वतीने मागवण्यात आलेल्या निविदांमध्ये जीएसटी कर प्रणालीचा अवलंब न केल्यामुळे प्रशासनाने मंजुरीसाठी आणलेले प्रस्ताव मागे घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विकासकामांना फटका बसत असतानाच आता या जीएसटीमुळे घाटकोपर बर्वेनगर हिंदू स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण, तसेच राजावाडी रुग्णालयाच्या इमारत दुरुस्तीच्या कामाला खिळ बसवणार आहे.
महापालिकेच्या ‘एन’ विभागातील बर्वेनगर स्मशानभूमी सौंदर्यीकरणाच्या कामासाठी 1.29 कोटींच्या कंत्राटाकरता कंत्राटदाराची निवड केली आहे. परंतु, या कंत्राट कामांसाठी निविदांमध्ये जीएसटी कराची आकारणी न केल्यामुळे हे कंत्राट रद्द करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीला पाठवला आहे. परंतु, हा प्रस्ताव मागे घेऊन याच्या निविदा पुन्हा काढाव्या लागणार असल्याचे बोलले जात आहे.
राजावाडी महापालिका रुग्णालय परिसरातील तळ अधिक दोन मजल्यांच्या जुन्या इमारतीची मोठ्या प्रमाणात व्यापक दुरुस्ती करण्यासाठीही निविदा मागवून कंत्राट कंपनीची निवड करण्यात आली आहे. 2.62 कोटी रुपयांच्या कंत्राटासाठी मोक्ष कन्स्ट्रक्शन या कंपनीची निवड करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव आरोग्य पायाभूत सुविधा कक्षाने आयुक्तांच्या माध्यमातून स्थायी समितीपुढे मंजुरीला पाठवला आहे. परंतु, जीएसटीअभावी हा प्रस्ताव प्रशासन पुन्हा मागे घेऊन याच्या पुन्हा निविदा काढण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा -
मदत कसली करता? इमारती दुरुस्त करा! - शिवसेनेचा सरकारला टोला
मुंबईच्या विकासकामांना जीएसटीचा फटका, कंत्राटे होणार रद्द