मुंबई महापालिकेच्या शीव (सायन) तलावातील अस्वच्छतेमुळे पाण्यातील ऑक्सिजनअभावी मासे मरू लागले आहेत. सलग दोन दिवसांपासून तलावातील विविध प्रजातींचे मासे मरत असताना या तलावाची जबाबदारी असणाऱ्या महापालिकेकडून कुठलीही उपाययोजना अद्याप करण्यात आलेली नाही.
मालाडमधील शांताराम तलावातील पाणी प्रदूषित होऊन मासे मरण्याचे प्रकार सुरू असतानाच सायन तलावातील मासेही मरू लागले आहेत. या तलावात रविवारी २५ तर सोमवारी १५ विविध प्रजातींचे मासे मेले. या तलावात गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात मूर्तींचं विसर्जन करण्यात येतं. त्यामळे तलावात प्रचंड गाळ साचून पाणी प्रदूषित होत आहे. गाळ न काढल्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन हे मासे मरत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
स्थानिक भाजपा नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकाराबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध केला. या तलावाचं सुशोभीकरण व स्वच्छता करण्यासाठी मागील अर्थसंकल्पात ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. परंतु हा निधी तसाच पडून आहे. सोबतच यावेळच्या अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नगरसेवक म्हणून निवडून आल्यापासून मी या तलावातील गाळ काढणे, तलावाची स्वच्छता, तलावाभोवती संरक्षक कठडे उंच करणे यासाठी प्रशासनाचा पाठपुरावा करत आहे. परंतु प्रशासन निविदेपालिकडे जात नाही. ३ वेळा निविदा काढूनही या कामांसाठी कंत्राटदार येत नसल्याचं उत्तर महापालिका अधिकारी देत आहेत. कंत्राटदार ठेवा बाजूला आधी मरणाऱ्या माशांचा जीव वाचवण्यासाठी उपाययोजना करा अशा सूचना मी प्रशासनाला केल्या आहेत. परंतु अजूनही महापालिकेकडून कुठलीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे स्थानिकांच्या मदतीने पाण्यात ऑक्सिजन सोडून आम्ही मासे वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असं शिरवडकर यांनी सांगितलं.
उद्यान विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव यांनी तलावाच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याचं सांगत सध्या मरत असलेल्या माशांना वाचवण्यासाठी त्वरित उपाययोजना करता येणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं.
पर्यावरण तज्ज्ञ यांच्या मते, मासे थंडीत खोलवर किंवा तळाशी जाऊन राहतात, परंतु या तलावातील गाळ मागील १० वर्षांपासून न काढल्यामुळे या माशांना तळाशी जाता येत नसल्याने हे मासे मरत असावेत.