मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीत नानाविध विघ्नं येत अाहेत. मनसे, शिवसेना, स्थानिक लोक अाणि अन्य राजकीय पक्षांनी बुलेट ट्रेनविरोधात दंड थोपटले असताना अाता त्यात गोदरेज समूहाचीही भर पडली अाहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी व्हेन्टिलेशन डक्ट उभारण्याकरिता जागा हवी असताना अाता गोदरेज समूहानं ही जागा देण्यात नकार देत थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली अाहे. बुलेट ट्रेनसाठी जागा देण्यास अामचा विरोध असून बुलेट ट्रेनचा मार्ग बदलण्यात यावा, अशी मागणी गोदरेजनं याचिकेद्वारे करत उच्च न्यायालयात धाव घेतली असून यावर ३१ जुलैला सुनावरणी होण्याची शक्यता अाहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशन लिमिटेडला (एनएचआरसी) विक्रोळीतील गोदरेज समूहाची ४ एकर जागा हवी आहे. बुलेट ट्रेन हा भुयारी मार्ग असून या मार्गात मोकळी हवा पुरवण्यासाठी व्हेंटिलेशन डक्ट बांधण्यात येणार आहे. या डक्टमध्ये मोकळी हवा पुरवण्यासाठीची सर्व यंत्रणा असणार असून येथूनच याचं व्यवस्थापन आणि देखभाल केली जाणार आहे.
या डक्टसाठी उपनगरात जागा हवी असल्यानं एनएचआरसीनं विक्रोळीतील सीटीएस क्रमांक 51 ही चार एकरची जागा शोधून काढली. ही जागा गोदरेज समुहाच्या मालकीची असून ही जागा ताब्यात घेण्यासाठी राज्य सरकारनं गोदरेज समुहाला या जमिनीच्या बाजारभावाच्या 225 टक्के मोबदला देण्याची तयारी दाखवली आहे. या जागेच्या जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू असतानाच गोदरेज न्यायालयात गेलं आहे.
बुलेट ट्रेनच्या व्हेंटिलेशन डक्टसाठी गोदरेज समूहाच्या मालकीच्या ज्या जागेची मागणी केली जात आहे, ती जागा समूहाला स्वत:च्या वापरासाठी हवी असल्याचं समजतं आहे. त्यामुळेच गोदरेजनं बुलेट ट्रेनचा मार्ग बदलावा, अशी मागणी याचिकेद्वारे केल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, बुलेट ट्रेन प्रकल्पातील व्हेंटिलेशन डक्ट हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असल्यानं तो मार्गी लागणं अत्यंत गरजेचं आहे. असं असताना गोदरेजनं न्यायालयात धाव घेत बुलेट ट्रेनच्या अडचणी वाढवल्या आहेत. या याचिकेवर ३१ जुलैला सुनावणी होणार असल्यानं आता या सुनावणीकडेच सर्वांच लक्ष लागलं आहे. यासंबंधी एनएचआरसीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी 'मुंबई लाइव्ह'नं संपर्क साधला. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं म्हणत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला.
हेही वाचा -
बीकेसीतली बुलेट ट्रेन, विक्रोळीतून घेणार श्वास!
मोदींच्या बुलेट ट्रेनविरोधात ठाकरे बंधू एकवटले!