वडाळाच्या अॅन्टॉप हिल परिसरातील लॉयड्स इस्टेट इमारतीची संरक्षक भिंत खचल्याची घटना २५ जूनला घडली होती. ही घटना ताजी असतानाच घाटकोपर पूर्वमधील अारसिटी माॅलबाहेरील 'कल्पतरू ऑरा' या सोसायटीची संरक्षक भिंत शुक्रवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास खचली. तर भिंतीच्या बाजूचा रस्ताही खचला अाहे. सोसायटीच्या बाजूला नाला असल्यामुळे येथील रहिवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे.
कल्पतरू ऑरा सोसायटीमध्ये एकूण १७ इमारती असून त्यामध्ये एकूण १२४७ फ्लॅट्स आहेत. भिंत पूर्णपणे कोसळल्यास बाजूला असलेल्या नाल्याचे पाणी सोसायटीत घुसू शकते. त्यामुळे येथील दोन इमारतींना धोका पोहचेल, असं येथील रहिवाशांनी सांगितलं.
मंगळवारी ३ जुलैला या सोसायटीच्या संरक्षक भिंतीला थोडे तडे गेले होते. त्यानंतर रहिवाशांच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली होती. त्यानुसार शुक्रवारपासून तडे गेलेल्या संरक्षक भिंतीच्या मजबुतीकरणाचं काम सुरु होणार होतं. मात्र, काम सुरु करण्यापुर्वीच संरक्षक भिंत खचल्याने येथील रहिवाशांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे. तसंच ज्या ठिकाणची संरक्षक भिंत खचली आहे, त्या ठिकाणी या सोसायटीचं पार्किंग आहे.
कल्पतरू ऑरा सोसायटीच्या संरक्षक भिंतीला याआधी सप्टेंबर २०१७ मध्ये तडे गेले होते. त्यावेळे रहिवाशांनी स्थानिक नगरसेवकासह महापालिका आणि इमारतीच्या बिल्डरला पत्र लिहून तक्रार केली होती. मात्र, महापालिकेनं त्याकडं दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे अाॅक्टोबर महिन्यात इमारतीच्या बिल्डरने या ठिकाणी मातीचा भराव घातला होता. पण कायमस्वरूपी मजबूतीकरणाचं काम करण्यात अालं नाही.
हेही वाचा -
ठाणे स्थानकावरील भार लवकरच 'हलका', विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा
शिक्षक पात्रता परीक्षा १५ जुलैला