अग्निसुरक्षा विषयक तपासणी मोहिमेदरम्यान ज्या ठिकाणी तोडकाम कारवाई झाली असेल, त्याठिकाणी देखील पुनर्तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. मात्र, या तपासणीदरम्यान तोडकाम केलेल्या ठिकाणीच पुन्हा बांधकाम झाल्याचे आढळून आले, तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मेहता यांनी दिले आहेत. त्यामुळे तोडलेल्या ठिकाणी जर पुन्हा बांधकाम करण्याची हिंमत केली तर कायमचेच शटर बंद होणार आहे!
कमला मिलमधील आगीच्या दुघर्टनेनंतर सलग दोन दिवस सुमारे ६५० हॉटेल्स, पब तसेच हुक्का पार्लरमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईकरण्यात आली. या कारवाईच्या अनुषंगाने सर्व परिमंडळाच्या उपायुक्तांना तोडलेल्या बांधकामांची तपासणी करून याबाबत तक्रारी आल्या होत्या का? तसेच यावर कारवाई करण्यास विलंब का झाला? याची कारणे जाणून घेऊन त्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार सर्व परिमंडळांच्या उपायुक्तांची बैठक महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या दालनात पार पडली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्तांसह उपायुक्त (विशेष) निधी चौधरीही उपस्थित होत्या. यावेळी मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तळघर, गोडाऊन, उपहारगृहे इत्यादींची अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोहीम स्वरुपात तपासणी व कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी या बैठकीत दिली.
३० डिसेंबर २०१७ पासून अग्निसुरक्षेच्या दृष्टिकोनातून ५ हजार २६९ हॉटेल्स, तळघर (बेसमेंट), नाट्यगृहे, गोडाऊन, चित्रपटगृहे आदींची तपासणी करण्यात आली. या तपासणीत २ हजार ९७३ हॉटेल्स, मॉल आदींना नोटीस तथा तपासणी अहवाल देण्यात आलेत. यापैकी ६८४ ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय ७२ हॉटेल्स, मॉल ‘सील’ करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी या बैठकीत दिली. यामध्ये घाटकोपरमधील आर सिटी मॉलमधील फूड कोर्ट आणि वांद्रे पश्चिम लिंकिंग रोडवरीज लिंक स्वेअर मॉलमधील टॅब रेस्तराँ हे सील करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ज्या हॉटेल्स, मॉलमध्ये तपासणी दरम्यान काही अनियमित दिसून आली, त्यांना नोटीस तथा तपासणी अहवाल देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांनी आवश्यक त्या बाबींची पूर्तता नियोजित वेळेत करायला हवी. आणि तपासणी अहवालाप्रमाणे संबंधितांनी सुधारणा केल्या आहेत की नाही याचीही पुनर्तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले. मात्र, निश्चित कालावधीत जर अपेक्षित बदल तसेच सुधारणा न केल्यास त्यांच्यावरही तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
चित्रपटगृह, नाट्यगृह
तपासणी : ४० ठिकाणी
अनियमितमा आढळून आलेली ठिकाणे : ०६
मॉल
तपासणी : ५४ ठिकाणी
अनियमिता आढळून आलेले मॉल : ३७
कारवाई केलेले मॉल : ४
सील केलेले मॉल : २
तळघर (बेसमेंट)
तपासणी केलेले बेसमेंट : ५८
अनियमतता : २४ ठिकाणी
कारवाई केलेले तळघर : ४
सील केलेले तळघर : १२
गोदामे
तपासणी केलेली गोदामे : १७
अनियमितता असलेली गोदामे : १५
कारवाई केलेली गोदामे : १
हेही वाचा