कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात सुविधांची कमतरता असणं रुग्णांसाठी धोकादायक आहे. हे चित्र उद्भवू नये यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. परतु, अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात अशीच परिस्थिती उद्भवल्यानं रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गिझर बंद असल्याने थंड पाण्याची अंघोळ, पिण्यासाठी गरम पाण्याची कमतरता, प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेचा अभाव, साचलेल्या कचऱ्याची दुर्गंधी असे चित्र विलगीकरणाची व्यवस्था असलेल्या अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात आहे.
या गैरसोयींमुळे येथील विलगीकरण आणि अलगीकरण कक्षात दाखल करोना संशयीत आणि बाधित रुग्ण हैराण झाले आहेत. परदेशवारी करुन मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यासाठी पालिकेनं अंधेरीतील मरोळ परिसरातील बंद असलेल्या सेव्हन हिल्स रुग्णालयात व्यवस्था केली.
परदेशवारीहून परतलेल्यांची सेव्हन हिल्समधील विलगीकरणात रवानगी झाली. या मंडळींनी सेव्हन हिल्समधील व्यवस्थेबाबत महापालिकेचे तोंड भरुन कौतूक केले. मात्र आता येथील परिस्थिती बदलल्याची खंत तेथे दाखल रुग्ण व्यक्त करू लागले आहेत. सेव्हन हिल्समध्ये विलगीकरण आणि अलगीकरणात अनुक्रमे संशयीत आणि बाधित रुग्णांना ठेवण्यात आले आहे.