मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या नवीन क्लब हाऊस, बँक्वेट हॉलच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेकडून परवानगी मिळाली आहे. घोड्यांच्या शर्यती आणि संबंधित उपक्रमांसाठी जुलै 2024 मध्ये आरडब्ल्यूआयटीसीला भाड्याने दिलेल्या 93 एकर जागेपैकी 32 एकर जमीन प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे.
रेस कोर्स आर्किटेक्ट्सच्या प्रस्तावित 17000 चौरस मीटर क्लबहाऊसमध्ये दोन बेसमेंट पार्किंग लेव्हल आणि सात मजले असतील. यामध्ये वरच्या पाच मजल्यांमध्ये 177 लॉजिंग रूम असणार आहेत. तर पहिल्या मजल्यावर बेकरी, डिपार्टमेंट स्टोअर, कार्ड आणि टेबल टेनिस रूम, बँक्वेट हॉल, प्ले एरिया, स्विमिंग पूल आणि स्वयंपाकघर असेल अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
तसेच, बँक्वेट हॉल, स्वयंपाकघर आणि पेंट्रीसह दुसरे क्लबहाऊस देखील असणार आहे.
पर्यावरण कार्यकर्ता झोरू भाथेना यांनी या प्रकल्पावर टीका करताना म्हटले, रेसकोर्सचा हेतू केवळ घोड्यांच्या शर्यती आणि त्याच्या देखभालीसाठी होता. अतिरिक्त FSI मागणे म्हणजे सार्वजनिक जमिनीचा उघड उघड व्यावसायिक गैरवापर आहे. आम्ही पूर्वी 1.33 FSI च्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला होता, जो नंतर 0.3 पर्यंत खाली आणला गेला.
रेसकोर्सचा इतिहास
211 एकर जमीन RWITC ला शंभर वर्षांपेक्षा जास्त काळासाठी भाड्याने देण्यात आली होती. 2013 मध्ये भाडेपट्टा संपल्यानंतर, बीएमसीने त्यापैकी काही भाग ताब्यात घेऊन सुमारे 300 एकरचा सेंट्रल पार्क विकसित करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यात मुंबईच्या सागरी किनाऱ्यावरील 175 एकर भागही समाविष्ट असेल.
हेही वाचा