घाटकोपर विमान दुर्घटनेप्रकरणी जबाबदार धरत राज्य सरकारने चार्टर्ड विमानाची मालक कंपनी यू. वाय. एव्हिएशन कंपनीला काळ्या यादीत टाकलं आहे. या दुर्घटनेत एका पादचाऱ्यासहित विमानातील चार जणांचा मृत्यू झाला होता.
२५ मे २०१७ लातूरचा दौरा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर चारजण हेलिकॉप्टरनं मुंबईला येण्यास निघाले असताना तांत्रिक बिघाडामुळे अवघ्या काही क्षणात टेक आॅफ केलेल्या हेलिकाॅप्टरला जमिनीवर उतरावं लागलं होतं. मुख्यमंत्र्यांसह चारजण मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. इथं नमूद करण्याची बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांचं हे हेलिकॉप्टर यू. वाय. कंपनीचंच होतं.
दुर्घटनाग्रस्त विमानाला २००९ मध्ये अलाहाबाद इथंही एकदा अपघात झाला होता. या अपघातात या विमानाचं प्रचंड नुकसान झाल्यानं त्याची दुरूस्ती करण्यासाठी मोठा खर्च करावा लागणार होता. त्यामुळेच या विमानाचा लिलाव करण्याच निर्णय उत्तरप्रदेश सरकारने घेतला होता.
जवळपास तीनवेळा या विमानाच्या लिलावाचा अयशस्वी प्रयत्न झाल्यानंतर अखेर २०१४ मध्ये या विमान विक्रीचा व्यवहार यशस्वी झाला आणि हे विमान यू. वाय. एव्हिएशन या कंपनीने विकत घेतलं. उत्तर प्रदेश सरकारकडून विकत घेतल्यानंतर यू वाय. एव्हिएशनने हे विमान दुरुस्तीसाठी इंडामेर कंपनीला दिले. २२ कोटी रुपये खर्च करुन या विमानाची दुरुस्ती करण्यात आली होती.
या दुर्घटनेत वैमानिक मारिया झुबेरी, सहवैमानिक प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे या चौघांचा मृत्यू झाला, तर गोविंद पंडित या पादचाऱ्याचाही मृत्यू झाला. यू. वाय. एव्हिएशन कंपनीचे किंग एअर सी ९० एअरक्राफ्ट VT-UPZ हे विमान चालवणाऱ्या वैमानिकांना उड्डाणाचा दांडगा अनुभव असून त्याशिवाय सहवैमानिकाला विमान उड्डाणाचा चांगला अनुभव होता.
तसंच यातील मुख्य वैमानिकाला ५ हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव असून सहवैमानिक हा पूर्वी जेट एअरवेजमध्ये कामाला होता. तर इंजिनीअर आणि टेक्निशियन हे दोघंही इंडामेर या कंपनीचे कर्मचारी होते.
हेही वाचा-
घाटकोपरसारखी विमान दुर्घटना झाल्यास कोर्टाकडे बोट दाखवू नका- उच्च न्यायालय
घाटकोपर विमान दुर्घटना: नुकसान भरपाईशिवाय मृतदेह हाती घेणार नाही, मृत पादचाऱ्याचा भावाचा आक्रोश