पवई हा मुंबईतील हिरवाईने नटलेला महत्त्वाचा परिसर आहे. येथील तलाव परिसरात बांधण्यात येणाऱ्या सायकल आणि जॉगिंग ट्रॅक बरोबरच सौंदर्यीकरणाच्या कामाची पर्यटन मंत्री तथा उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य जपून आंतरराष्ट्रीय दर्जाची कामे करावीत, असे निर्देश आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलारासू, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील आदी यावेळी उपस्थित होते.
पवई तलाव परिसराचं जतन आणि सौंदर्यीकरण करताना इथं सुमारे १० कि.मी.चा सायकल आणि जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येत आहे. इथं लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांच्या सोयीच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध कराव्यात. अंतर जास्त असल्याने विविध ठिकाणी प्रवेश आणि बाहेर पडण्याची सोय असावी. निसर्गाशी साधर्म्य साधणारी रंगसंगती ठेवून तसंच निसर्गाची हानी न करता हिरवाई जपून अधिकाधिक नागरिकांना आकर्षित करता येईल, असं पर्यटनस्थळ विकसित करावं, अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
हेही वाचा- पवई परिसरातील मिठी नदीवर विक्रमी वेळेत पूल उभारणी
पवई तलाव मुंबईकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. मात्र मागील काही वर्षांपासून पवई तलावाच्या आजूबाजूला अनेक झोपडपट्टया, इमारतींसह औद्योगिक कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. या सर्व झोपडपट्टया, इमारती आणि औद्योगिक कंपन्यांमधील सांडपाणी या तलावात सोडलं जात असल्याने तलावातील पाण्याचा दर्जा खालावत गेला आणि प्रदूषणाचा स्तर वाढला. मात्र त्यानंतर महापालिकेने पुढाकार घेऊन प्रदूषणाला आळा घालत पवई परिसराच्या सौंदर्यीकरणाचं काम हाती घेतलं.
दरम्यान, पवई परिसरातील मिठी नदीवर महापालिकेने विक्रमी वेळेत पूल उभारणी केली आहे. मुंबईतील पवई परिसरात मिठी नदीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केवळ ५ महिन्यात पुलाचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं आहे. तब्बल ३४ मीटर लांब आणि २४ मीटर रुंदी असणाऱ्या या नव्या पुलामुळं पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा आणखी एक मार्ग आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. पूर्व उपनगरातील पवई फिल्टरपाडा परिसरातून जाणाऱ्या साकी विहार मार्गाद्वारे पश्चिम उपनगरातील आरे कॉलनी परिसरात जाता येतं.